Weather Update – राज्यासह देशातील हवामानात मोठा फरक जाणवत आहे. पहाटे हवेत गारवा पाहायला मिळत आहे. तर राज्यासह देशभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.
राज्यासह देशात पुढील 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात कोकणासह गोव्यालाही जोरदार पावसाचा फटका बसणार आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. राज्यात कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.
राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली लातूर या सह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. बुधवारीही या भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला आहे.
येत्या 24 तासात गोवा कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर-पश्चिम राजस्थानमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.