पिंपरी -बांधकाम साहित्याचे दर वाढले असले तरीही त्या तुलनेत दिवाळीच्या कालावधीत फ्लॅटचे दर आवाक्यात राहिल्याने फ्लॅटच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीमध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंत प्रतिसाद वाढला आहे. विभागानुसार हे प्रमाण कमी-अधिक आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार, आता दिवाळी संपल्यानंतर फ्लॅटच्या किमतीत 7 ते 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट आली. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. जून महिन्यापासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. टप्प्याटप्प्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले. गतवर्षी दिवाळी साधेपणाने साजरी झाली.
गेल्या वर्षी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात फ्लॅट विक्रीला प्रतिसाद मिळाला होता. त्या तुलनेत यंदाची मात्र दिवाळी उत्साहात साजरी झाली आहे. काही कंपन्यांनी पगारवाढ दिली आहे. सरकारी संस्था आणि काही खासगी कंपन्यांनीदेखील यंदा बोनस दिला आहे.
बॅंकांकडून प्रथमच सर्वाधिक कमी 6.5 टक्क्यांपासून गृहकर्ज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत फ्लॅट विक्री वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बांधकाम साहित्याचे दर सध्या वाढले आहेत. सिमेंट, स्टील, खडी, वाळूच्या दरात वाढ झाली आहे.
पर्यायाने, बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे फ्लॅटच्या किमतीत वाढ होणे स्वाभाविक होते. मात्र, दिवाळीच्या कालावधीत या किंमतीत वाढ करणार नसल्याचे क्रेडाई संस्थेकडून जाहीर केले होते. त्यामुळे किंमती ग्राहकांच्या आवाक्यात राहिल्याने दिवाळीच्या कालावधीत फ्लॅट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने फ्लॅटच्या दरामध्ये वाढ करावी लागणार आहे. दिवाळीच्या कालावधीत ही वाढ करण्यात आली नाही. मात्र, आता दिवाळी संपल्यानंतर फ्लॅटच्या दरात 7 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागणार आहे, असे क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी नमूद केले.
बांधकाम साहित्याचे दर वाढले असले तरी दिवाळीच्या कालावधीत फ्लॅट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत हा प्रतिसाद 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धात्मक स्थितीमुळे बांधकाम व्यावसायिकांकडून दिवाळी संपल्यानंतर आता दर वाढविले जाण्याची शक्यता कमी आहे. जरी दर वाढविले गेले तरी ते जास्त दिवस टिकणार नाहीत.
– मनोज जरे, बांधकाम व्यावसायिक.
दिवाळीच्या कालावधीत फ्लॅट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्याने फ्लॅट विक्री वाढली आहे.
– आर. आर. लुंकड, बांधकाम व्यावसायिक.