पुणे शहराच्या चारही दिशांना विभागीय अग्निशमन केंद्रे

कोथरूड-बावधनसाठी चांदणी चौकात पहिले केंद्र उभारण्यास सुरुवात

पुणे – विस्तारित पुण्यातील नागरिकांसाठी सर्व सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यरत असून, पुण्याच्या चारही दिशांना अग्निशमन दलाची विभागीय प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. त्यापैकी कोथरूड-बावधनसाठी चांदणी चौक येथे पहिले विभागीय केंद्र उभारण्यास सुरुवात झाली आहे.

शहराच्या वाढत्या परिघाचा विचार करता, अंदाजे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कोथरूड-बावधन परिसरासाठी विभागीय अग्निशमन केंद्र ही गरज आहे. त्यामुळेच सध्या महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि भविष्यात हद्दीत येऊ शकणाऱ्या गावांचा विचार करून महापालिकेने चार विभागीय केंद्रे आणि प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चांदणी चौक येथील विभागीय केंद्रासाठी 5,610 चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यापैकी 1,220 चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम केले जाणार आहे. या केंद्रात पाच अग्निशमन गाड्या असतील. तसेच तीन गाड्यांसाठी स्वतंत्र गॅरेज, प्रशिक्षणार्थींसाठी अत्याधुनिक कॉन्फरन्स हॉल, व्यायामशाळा, निवासव्यवस्था अशा सोयी असणार आहेत.

महापालिकेच्या भवन रचना विभागामार्फत याचे काम सुरू झाले आहे. हडपसर, कात्रज आणि बालेवाडी येथेही अग्निशमन दलाची विभागीय केंद्रे उभारण्यासाठी आवश्‍यक ती जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय मार्केटयार्ड, धानोरी आणि काळेपडळ येथील अग्निशमन केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, खराडी, महंमदवाडी व नांदेड सिटी येथील अग्निशमन केंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे.

अग्निशमन दलासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे, शहराच्या क्षेत्रफळानुसार अग्निशमन केंद्रांची संख्या निश्‍चित केली जाते. “केंद्रीय अग्निसुरक्षा सल्लागार समिती’च्या निकषांनुसार प्रत्येक दहा चौरस किलोमीटरसाठी एक अग्निशमन केंद्र असणे आवश्‍यक आहे. यानुसार वाढीव क्षेत्रफळाचा विचार करता महापालिकेकडे 65 ते 70 अग्निशमन केंद्र असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी महापालिकेतर्फे जोरकस प्रयत्न केले जात आहेत. समाविष्ट गावांतील अग्निशमन केंद्रांसाठी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासह नव्याने जागा आरक्षित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

आगीच्या घटनांसोबतच गॅसगळती, झाडे पडणे, रस्त्यांवरील अपघात, घर किंवा भिंती कोसळणे अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगी अग्निशमन दलाचे जवान प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावत असतात. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या 60 वाहनांमध्ये 70 मीटर उंची गाठू शकणाऱ्या अत्याधुनिक गाड्यांपासून ते वेगाने घटनास्थळी जाण्यासाठी उपयुक्त असलेल्या दुचाकींचा समावेश आहे.

अग्निशमन दलातर्फे तातडीची मदत
करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी गेल्यावर्षी शहरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये आगीच्या घटनांमध्ये निम्म्याने घट झाली. 2019 मध्ये आगीच्या 987 घटनांची नोंद झाली होती, तर हा आकडा 2020 मध्ये 506 इतका खाली आला. तसेच गॅसगळती, तेलगळती, रस्ते अपघात अशा प्रसंगांमध्येही एक तृतीयांशाने घट झाली आहे. वादळ किंवा पावसामुळे झाडे पडण्याच्या एक हजारांहून अधिक घटनांच्या वेळी अग्निशमन दलाने तातडीने मदत केली.

महानगराचा विस्तार झाल्यावर अग्निशमन दलाची जबाबदारीही मोठ्या प्रमाणात वाढते. या दलाला अत्याधुनिक साधनांची उपलब्धता करून देणे आणि उच्च प्रतीचे प्रशिक्षण देणे, ही महापालिकेची जबाबदारी आहे. सुरक्षित शहरासाठी सुसज्ज अग्निशमन केंद्रांची उभारणी व नव्या केंद्रांचे नियोजन हा त्याचाच भाग आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.