महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस १०८ च्या कामकाजाची विभागीय आयुक्ताकडून पाहणी

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या ‘कंट्रोल रुम’ ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मिळत असलेल्या सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड आणि इतर रुग्णांना तात्काळ उपचाराच्या दृष्टीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आणखी गतीने सेवा मिळावी यासाठी डॉ. म्हैसेकर यांनी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या.

यावेळी ‘यशदा’च्या उपमहासंचालक नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके, व्यवस्थापक डॉ. प्रवीण साधले आदी उपस्थित होते.

108 कंट्रोल रूममधून होणाऱ्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन कंट्रोल रूमच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातून दुरध्वनी आल्यानंतर किती वेळात रुग्ण रुग्णालयात पोहचतो, डॅशबोर्ड प्रमाणे बेड उपलब्धता, रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचकरेपर्यंत उपचारपध्दती, रुग्णउपचार नोंद, कोविड रुग्ण व इतर रुग्ण याबाबतची घ्यावयाची दक्षता, रुग्णवाहिका सॅनिटायझेशन आदी सुविधाची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली.

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या माध्यमातून पुणे विभागात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून झालेल्या सेवेचे जिल्हानिहाय विश्लेषण देण्याच्या सूचना करून डॉ. म्हैसेकर म्हणाले, रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोच करेपर्यंत रुग्णवाहिकेत केल्या जाणा-या उपचाराची घेतलेली नोंद संबंधित हॉस्पिटलला तातडीने दिली तर उपचारासाठी उपयुक्त ठरेल. शहरी व ग्रामीण भागात रुग्णाला लागणारा कालावधी तसेच व्हॅटीलेटर उपलब्धता आदींची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी 108 रुग्णवाहिका व्यवस्थापन, कॉल येताच दिला जाणारा प्रतिसाद, लोकेशेने ट्रेसिंग, रुग्णांचे रेकॉर्ड, रुग्णवाहिकेतील उपचार तसेच इतर सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच 96 टक्के रुग्णवाहिका या ऑनरोड असतात, रुग्णवाहिकेबाबत 24 तासानंतर रुग्णांचा प्रतिसाद घेण्यात येत असून शाळा व समाजामध्ये 108 रुग्णवाहिकेबाबत जनजागृती केली जात असल्याचेळी त्यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.