राजगुरूनगर – खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या 6 राष्ट्रवादी 4 आणि भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांच्यासह 11 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी (दि. 24) अविश्वास ठराव दाखल केला आहे.
पंचायत समिती सभापती यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरणार आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या 14 पैकी 11 सदस्यांनी हा ठराव दाखल केला असून ते अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
तालुक्यात करोना परिस्थिती असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियोजन न करणे, कामकाजात, विकास कामांमध्ये सदस्यांना विश्वासात न घेणे, विकास कामांबाबत कोणतेही नियोजन आणि आवश्यक पाठपुरावा न करणे, मनमानी कारभार करणे, सदस्य विकास कामासंदर्भात मागणी करण्यास गेल्यावर उडवाउडवीची उत्तरे देणे,
अरेरावीची भाषा ववापरणे, महिला सदस्यांच्या मतदारसंघातील कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे, नियमबाह्य योजना राबविणे यामुळे विकासकामे ठप्प झाल्याचा सदस्यांना सभापती पोखरकर यांच्यावर रोष आहे. सभापतीपदाच्या निवडणूक दि.30 सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आली.
त्यावेळी भगवान पोखरकर, सुनिता सांडभोर आणि वैशाली जाधव यांनी उमेदवार अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेनेतील गटबाजी उघडकीस आली होती. वैशाली जाधव यांनी माघार घेतली आणि सुनिता सांडभोर यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने मतदान झाले.
यामध्ये भगवान पोखरकर निवडून आले. तर शिवसेनाचा उपसभापती करण्याऐवजी भाजपाचे एकमेव उमेदवार यांना निवडून आणल्याने शिवसेनेच्या सदस्यांमध्ये नाराजी अधिकच उफाळून आली. नाराज शिवसेनेच्या सदस्यांना बरोबर घेऊन भाजप उमेदवाराला ही संधी मिळाली.
या 11 सदस्यांच्या सह्या
खेड पंचायत समितीच्या 14 पैकी शिवसेनेच्या ज्योती अरगडे, कॉंग्रेसचे अमोल पवार हे सोडून अविश्वास ठरावावर शिवसेनेच्या सुनिता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, मंच्छीद्र गावडे, अमर कांबळे, अंकुश राक्षे तर राष्ट्रवादी चे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे, तर भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर अशा 11 सदस्यांच्या सह्या आहेत.
सोमवारी विशेष सभा
अविश्वास ठराव घेण्यासाठी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी 1 मे रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस मंगळवारी (दि. 25) काढण्यात आली आहे.
खटाटोप फक्त पदासाठी?
पंचायत समीतीत शिवसेनेची सत्ता असून त्यांचे 8, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी दोघांचा शिवसेनला पाठिंबा असल्याने त्यांचे 10 सदस्यांचे बलाबल आहे. सभापती पद सर्वसाधारण वर्गासाठी असून शिवसेनेच्या सदस्यांमध्ये आपसात ठरल्याप्रमाणे सर्वांना संधी मिळाली पाहिजे असा दावा इच्छुकांनी बोलून दाखवला होता. त्यासाठी हा अविश्वास दाखल केल्याची चर्चा आहे.
मागील निवडणुकीतही शिवसेनेत मतभेद
पंचायत समितीचा कर्यकाल 9 महिने राहिल्याने पद मिळवण्याची शर्यत व चुरस निर्माण झाली आहे. मागील सभापती, उपसभापती निवडणुकांमध्ये सुद्धा शिवसेनेत मतभेद असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांवर पक्षीय नेत्यांचा वचक राहिलेला नसल्याचे समोर आले आहे. तथापी अविश्वास ठराव शिवसेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी इतर सदस्यांना विश्वासात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.
मागे काही घडले असेल त्याबद्दल आता बोलणे योग्य नाही. पण उद्या किंवा यापुढील काळात पक्षाच्या माध्यमातून पदे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळे वागल्यास अशा कार्यकर्त्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. पंचायत समितीमध्ये पक्षाची सत्ता आहे. पक्षाचे वरिष्ठ योग्य निर्णय घेतील. पक्षाच्या माध्यमातून जनतेचा कौल घेऊन येथे पोहोचलेल्या पदाधिकारी किंवा सदस्यांना पक्षादेश मानावा लागेल.
– रामदास धनवटे, प्रमुख, शिवसेना, खेड तालुका