पुणे – करोनामुळे मनोरंजन सृष्टीला मोठा फटका बसला आहे. अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कलाकारांच्या मदतीसाठी तरुणाई पुढे सरसावली आहे.
मागील वर्षी मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्यामुळे नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद झाली. त्यामुळे कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागील कलाकार आदींना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे काही कलाकारांनी अन्य जोड व्यवसायांचा पर्याय निवडला आहे. मात्र, अद्यापही अनेकांची आर्थिक स्थिती बिकट आहे.
या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था पुढे येत कलाकारांना मदत करत आहेत. या अनुषंगाने शहरातील तरुण कलाकारदेखील सरसावले आहेत. यासाठी क्लबचर या संस्थेने पुढाकार घेतला असून, “कलाधार’ या उपक्रमाच्या माध्यमातून मदत निधी संकलित करण्यात येत आहे.
“कलाधार’ या उपक्रमांतर्गत फोटोग्राफी, नाट्य, नृत्य, संकलन, अभिनय, संगीत, दिग्दर्शन आदी विषयांवरील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये महेश लिमये, रवी जाधव, निपुण धर्माधिकारी, अमृता खानविलकर, फुलवा खामकर आदी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले आहेत.
या लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकारांना आर्थिक अडचणी येत असल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर “कलाधार’ या उपक्रमाची सुरुवात झाली. आम्ही फॉर्मद्वारे कलाकारांची माहिती एकत्रित केली. विविध माध्यमांतून सुमारे 100 कलाकारांशी संपर्क झाला असून, अधिकाधिक जणांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.
या उपक्रमांतर्गत आयोजित सत्रात सुमारे 200 हून अधिक जण सहभागी होत आहेत. अनेक कलाकार लाइव्हद्वारे सहभागी होत आहेत. “कलाकारांनी कलाकारांकडून कलाकारांसाठी’ या उपक्रमाचे आयोजन केल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही, असे क्लबचरचे संकेत अनगरकर यांनी सांगितले.