दिगंबर पडकर
जळोची – बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील ‘एआरटी’ विभाग ‘एचआयव्ही’ म्हणजेच एड्सग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. या विभागात मागील पाच वर्षात तब्बल 20 हजारांहून अधिक नागरिकांची एचआयव्हीची तपासणी केली आहे. यामध्ये 732 जण एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 2018 ते 2021 मध्ये 13 बाधित बालकांना उपचाराअंती बरे केले आहे.
एचआयव्ही म्हणजे ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्शी व्हायरस’ होय. हा व्हायरस एचआयव्ही बाधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा आहे. एचआयव्ही बाधित रुग्णांची हेळसांड न करता कॉलरा, मलेरिया, कर्करोग, क्षयरोग आदी आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचीकडे आपण जसे बघतो. तसाच दृष्टिकोण एचआयव्ही बाधित रुग्णांकडे ठेवणे गरजेचे आहे.
येथील रुग्णालयात असणाऱ्या ‘एआरटी’ विभागात बारामतीसह पुरंदर, इंदापूर, बार्शी, सोलापूर, दौंड, भोर, शिरूर, करमाळा, माळशिरस आदी भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णांवर सर्व प्रकारचे मोफत उपचार केले जातात. एक्स-रे, लॅब तपासण्या, सोनोग्राफी, आवश्यक औषधे विनामूल्य दिले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एआरटी’ विभागाकडून बाधित रुग्णांवर उपचारांबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचे कामही केले जाते.
करोना काळातही एचआयव्ही बाधित रुग्ण औषध उपचारापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी ‘एआरटी’ विभाग नियमित सुरू होता. शिवाय बहुतांशी बाधित रुग्णांना करोना लसीकरण ही करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या रुग्णालयात एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी असणाऱ्या विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती संत, समुपदेशक संदीप राऊत, औषध उपचारतज्ञ मनीषा माने, प्रयोग तज्ञ रूपाली डेंगले, माहिती व्यवस्थापक अभिजित पवार, परिचारिका सुप्रिया पवार आदींकडून योग्य उपचार केले जातात.
एड्स होऊ नये यासाठी दक्ष राहायला पाहिजे. यासाठी आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्यात येते. दुर्दैवाने एखाद्याला एड्स झालाच, तर अशा रुग्णाने खचून जाऊ नये. त्यावर सध्या प्रभावी औषध उपलब्ध आहे.
-डॉ. सदानंद काळे,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय बारामती
बालकांचा संसर्ग टाळता येऊ शकतो
एचआयव्ही बाधित गर्भवती मातेकडून बालकाला एचआयव्ही संसर्ग होऊ नये याकरिता तिला ‘एआरटी’ची उपचार पद्धती देण्यात येते. बाळ जन्मानंतर 72 तासांच्या आत व 6 आठवडे नेव्हीरॅंपीन औषध दिल्याने मातेकडून गर्भाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता आला आहे.
बाधित रुग्णांसाठी या आहेत योजना…
* संजय गांधी निराधार योजना
* अंत्योदय योजना
* एसटी व रेल्वे प्रवासात सूट
* प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा
* प्रधानमंत्री सुरक्षा विमा
* बाल संगोपन योजना
* अटल पेन्शन योजना