जिल्हा अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धा : डेक्कन जिमखान्याचे निर्विवाद वर्चस्व

पुणे – डेक्कन जिमखाना संघाने मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये विजेतेपद पटकावित कुमारांच्या इंदिराबाई जोशी स्मृती जिल्हा अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धेत नर्विवाद वर्चस्व गाजविले. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेने आयोजित केली होती.

डेक्कन जिमखान्याच्या “अ’ संघाने मुलांच्या अंतिम सामन्यात स्पोर्टस एरिना संघाचा 88-73 असा पराभव केला. वेगवान खेळामुळे चुरशीने झालेल्या या सामन्यात पूर्वार्धात डेक्कन जिमखाना संघ 39-29 असा आघाडीवर होता. त्यांच्या विजयात ओजस आंबेडकर, ओम पवार व राजेंदरसिंग चमकले. पराभूत संघाकडून असिफ खान, सनी पिसाळ व ऋषभकुमार यांनी दिलेली झुंज निष्फळ ठरली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत विद्यांचल संघाने अभिनव संघाचा 53-37 असा पराभव केला. त्यांच्याकडून कुणाल भोसले व जितेंद्र चौधरी यांचा खेळ शानदार होता. अभिनव संघाकडून आदी जगदाळे व गौरव लवाटे यांनी उल्लेखनीय लढत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलींच्या अंतिम लढतीत डेक्कन जिमखाना “अ’ संघाने सरदार दस्तूर संघाचा 48-29 असा पराभव केला. मध्यंतराला त्यांच्याकडे 22-11 अशी आघाडी होती. त्यांच्याकडून तिया कर्वे, अनिका खानोलकर व ईशा घारपुरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. दस्तूर संघाच्या सुधिक्षा कुलकर्णी व तन्वी साळवे यांची लढत अपयशी ठरली. डेक्कन जिमखाना “ब’ संघाने तिसरा क्रमांक मिळविला. त्यांनी चोंढे पाटील अकादमीवर 43-29 असा विजय मिळविला.

पूर्वार्धात 16-18 अशा पिछाडीवर असलेल्या डेक्कन जिमखान्याच्या इलिना देवधर व युक्ता चोरडिया यांनी वेगवान खेळ करीत विजयश्री खेचून आणली. चोंढे पाटील अकादमीच्या मानसी निर्मळकर व सई ब्राह्मणकर यांनी चांगली झुंज दिली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा संघटक ललित नहाटा, आनंद कुलकर्णी, चैतन्य दीक्षित व सुरेश शेलार यांच्या हस्ते झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)