पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले अनेक हात; एकाच दिवसात सुमारे चौदा कोटींचा निधी

बांधकाम व्यावसायिकांकडून भिलवडी दत्तक

मुंबई: राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असून राज्यभरातून विविध सामाजिक संस्था,लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नारडेको-क्रिडाई-एमसीएचआय हे बांधकाम व्यावसायिक सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे गाव पुनर्बांधणीसाठी दत्तक घेणार आहेत.

बांधकाम व्यावसायिकांच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वागत केले आहे. पूरग्रस्त भागात पुनर्वसन आणि पुनर्बांधणी वेगाने व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पूरग्रस्त भागात वेगाने पुनर्बांधणी व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पूरग्रस्त गाव अनेक घटकांनी दत्तक घेऊन, तिथे पुनर्बांधणीची तयारी दर्शविली आहे. या गावांचे अत्याधुनिक पद्धतीने पुनर्वसन व्हावे. यामध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून विशेष सहकार्य देऊ केले आहे. त्यामुळे रहिवाशी क्षेत्र आणि घरांची पुनर्बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांचा समावेश करण्यात यावा, असा आग्रह आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांनी त्या-त्या भागात जाऊन आपत्तीला तोंड देऊ शकणाऱ्या बांधकाम तंत्राबाबत स्थानिकांना प्रशिक्ष‍ित करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी स्थानिक तरूण स्थापत्य अभियंत्यांना सोबत घेऊन, त्यांना प्रशिक्षित करून पुनवर्सन आणि पुनर्बाधणीला वेग देण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.