सातारा -करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना त्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेनेही आर्थिक मदतीसह विविध उपाययोजनांचे योगदान दिले आहेत. या कार्याबद्दल बॅंकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीमार्फत कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी समितीचे विभाग प्रचारक केदार कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. समितीचे जिल्हा कार्यवाह मुकुंद आफळे, जिल्हा सद्भाव संयोजक चंद्रकांत धुळप, बॅंकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे व अधिकारी उपस्थित होते. बॅंकिंगबरोबर विकासाभिमुख कार्यात जिल्हा बॅंक नेहमीच अग्रेसर असते. बॅंकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये आर्थिक मदत केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बॅंकेच्या संचालकांचा सभा भत्ता, बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन, असे एकूण 16 लाख रुपये, एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील स्थलांतरीत व स्थानिक मजूर, शेतमजूर व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट पुरविण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केले आहेत.
बॅंकेच्या शाखांमध्ये गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गावास आठवड्यातील दिवस ठरवून दिले आहेत. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक तेवढ्या ग्राहकांना प्रवेश दिला जातो. वयोवृद्ध पेन्शनर व संजय गांधी निराधार योजनेतील ग्राहकांना घरपोच पेन्शन दिली जात आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅंडग्लोव्हज्चे वाटप करण्यात आले आहे. ग्राहकांनी एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस व डिजिटल बॅंकिंग व्यवहार करावेत. शाखांमध्ये विनाकारण गर्दी करू नये याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन ग्राहक व सेवकांना केले आहे. शाखा व 47 एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करण्यात येत आहे. बॅंकिंग सुविधा उपलब्ध नसलेल्या व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. कोव्हिड-19 वरील काळजी घ्या, घाबरू नका ही मार्गदर्शनपर पुस्तिका बॅंकेने गावोगावी पोहोचविली आहे. शासनाच्या निर्देशांचे व सूचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे. सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.