मलठण : काळेवाडी (ता. दौंड) येथील सुभद्रा वामनराव गायकवाड यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त सुभद्रा डेंटल क्लिनिक आणि बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबिरात १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यापैकी ३० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. सर्व रुग्णांना बुधराणी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पाठवण्यात आले.
डॉ. संदीप गायकवाड आणि कुटुंबीयांच्या वतीने शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. त्यामुळे काळेवाडी पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येतो. रुग्णसेवा व सामाजिक बांधिलकी या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यामुळे गायकवाड परिवाराचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.
दरवर्षी बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीने असे शिबिर घेण्यात येत आहे, असे गणेश गायकवाड यांनी सांगितले. या कार्यक्रमसाठी अशोक गोधडे, गौतम बरडे, अभिमन्यू माने, सागर यादव, बाबासाहेब गायकवाड, माधव गायकवाड, कैलास भोसले, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.