मुंबई, दि. 11- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना 176 कोटी 29 लाख पाच हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च भागविण्यासाठी या कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेऊन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 176 कोटी 29 लाख 5 हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामध्ये कोकणसाठी 1613.84 लाख, पुण्यासाठी 2810.79 लाख, नाशिकसाठी 4199.31 लाख, औरंगाबाद साठी 6154.93 लाख, अमरावतीसाठी 2091.10 लाख आणि नागपूरसाठी 759. 08 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा निधी कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी वितरित करण्यात आला आहे.