नवी दिल्ली : सध्या देशात करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. देशातील अनेक राज्यात रोजच बाधितांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच केंद्र सरकारनेही यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘देशात मागील 24 तासांत 4,435 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यासोबतच देशात करोनाचा पॉझिटीव्हिटी रेट 3.38 टक्के नोंदवला गेला आहे. तर साप्ताहिक कोरोना संसर्ग दर देखील 2.79 टक्क्यांवर पोहोचला आहे.’
दरम्यान, दिल्ली आणि महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोना बाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत 24 तासांत 509 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, दिल्लीतील पॉझिटिव्ह दर 26.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानीच्या पॉझिटीव्हिटी दरात एकाच दिवसात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एका दिवसापूर्वी हा पॉझिटीव्हिटी दर 15.64 टक्के होता. म्हणजेच, 24 तासांत पॉझिटिव्हिटी दर 10.9 टक्क्यांनी वाढला आहे. दिल्लीतील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1918 जणांची चाचणी करण्यात आली होती. ज्यामध्ये 509 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, दिल्लीत करोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. दिल्लीत सध्या 1795 सक्रिय रुग्ण आहेत.