लंडन – ब्रिटनमध्ये ऍस्ट्रोझेनेका लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर करोनाबाधितांच्या मृत्यूंमध्ये 80 टक्के घट झाली असल्याचे समोर आले आहे. लसीच्या पहिल्या डोसमुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 80 टक्क्यांनी कमी होतो. तर, अमेरिकन कंपनी फायझरच्या लशीच्या दोन डोसमुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 97 टक्क्यांनी कमी होत असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅंकॉक यांनी या निष्कर्षाचे स्वागत केले असून करोना महासाथीपासून बचाव करण्यासाठी लस प्रभावी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अंदाजानुसार, आतापर्यंत झालेल्या करोना लसीकरणामुळे किमान दहा हजार जणांचे प्राण वाचले आहेत. ब्रिटनच्या एक कोटी 80 लाख लोकसंख्येपैकी सरासरी दर तीन पैकी एका प्रौढ व्यक्तीला करोनाची लस देण्यात आली आहे. त्याशिवाय ब्रिटनमध्ये करोना संसर्ग, रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण आणि मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
ही आकडेवारी जाहीर करण्याआधी 50 हजार लोकांची माहिती तपासली असल्याचे पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटले आहे. या बाधितांना डिसेंबर ते एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाली होती. यातील 13 टक्के जणांना फायझरच्या लसीचा एक डोस आणि आणि 8 टक्के जणांना ऍस्ट्रोझेनेका लसीचा एक डोस देण्यात आला होता. या लसींमुळे मृत्यूचे प्रमाण घटत असल्याचे व हे प्रमाण 80 टक्के असल्याचे आढळून आले आहे.