थेऊर -करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक दानशूर व्यक्तींनी, विविध कंपन्यांनी व सेवाभावी संस्थांनी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत थेऊर ग्रामपंचायत प्रशासनास केली आहे. त्या मदतीचे तात्काळ वाटप मोलमजूर, गरजू व कष्टकरी बांधवांना न झाल्यास येत्या तीन दिवसांत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हवेली तालुकाध्यक्ष मारुती कांबळे यांनी दिला आहे. राजकारणाला थारा न देता गरजू नागरिकांना गटा- तटाच्या विभागणी यादीत न टाकता ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.
थेऊरमध्ये कष्टकरी, मोलमजुरी व मासेमारी करून उपजीविका करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळात कडक निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने बहुतांशी नागरिक शासकीय मदत व दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीवर अवलंबून आहेत. शासकीय मदतीचा आधार तुटपुंजा व बेभरवशाचा असल्याने अनेकजण दोनवेळेच्या जेवणांसाठी हवालदिल झाले आहेत.
दानशूर व्यक्ती व कंपनीने केलेल्या मदत स्वरुपामुळे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू यांचा साठा उपलब्ध झाला आहे; मात्र गरजू नागरिकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यादी पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब दोनच दिवसांमध्ये सुमारे पंधराशे नागरिकांना याचे वाटप होईल. दीड महिन्यापूर्वी साधारणतः 850 नागरिकांना मदतीचे वाटप ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
– बी. आर. कांबळे, ग्रामविकास अधिकारी, थेऊर.