चिमुकल्याच्या मृत्युप्रकरणी कारवाई; अनेक गोष्टींचा पर्दाफाश
डिकसळ – भिगवण (ता. इंदापूर) येथे काही दिवसांपूर्वी 14 महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार सुरु असताना झालेल्या मृत्यूप्रकरणी संतप्त झालेल्या नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे आरोग्य विभागाकडून येथील रामलावण्य हे लहान मुलांचे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीत यामध्ये अनेक त्रुटी समोर आल्या असून सदर हॉस्पिटलचा परवाना पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रद्द करण्यात आला आहे.
हॉस्पिटलच्या अनेक नियमबाह्य गोष्टी झाल्या उघड
मदनवाडी (ता. इंदापूर) येथील 14 महिन्यांचा वेदांत सोमनाथ राऊत या चिमुकल्याला ताप आल्याने दि. 9 नोव्हेंबरला रामलावण्य हॉस्पीटलमध्ये दाखल केले असताना डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळानी पुढील औषध उपचारांसाठी बारामती येथे जाण्यास सांगण्यात आले होते. परंतु, तत्पूर्वीच वेदांत याचा मृत्यू झाल्याचे पालकांच्या लक्षात आल्याने हॉस्पीटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, भिगवण येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी आंदोलन करीत सदर हॉस्पीटलवर कारवाईची मागणी केली होती. आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा देण्यात आल्याने आरोग्य विभागाकडून रामलावण्य हॉस्पीटलची तपासणी करून हे हॉस्पीटल सील केले होते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कामकाजाची तपासणी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीवेळी हॉस्पीटलमध्ये अनेक उणीवा आरोग्य विभागाला जाणविल्या. यामध्ये खाटांच्या प्रमाणात नर्सिंग स्टॅफ नसणे, आंतररुग्ण रजिस्टर नसणे, बिलबुक आणि रिसिप्टबुक उपलब्ध नसणे, ऑटोबुक नसणे, 24 तास व्हिजिटींग डॉक्टरची उपलब्धता नसणे, बायोमेडिकल वेस्टबाबत रेकॉर्ड नसणे, लेटरहेडवर नमूद करण्यात आल्याप्रमाणे सुसज्ज आंतररुग्ण विभाग, बालरुग्ण अतिदक्षता विभाग, सेंट्रल ऑक्सीजन, अत्याधुनिक वार्मर आणि फोटोथेरपी युनिट नसणे इत्यादी सुविधा उपलब्ध नसल्याचेही आढळून आले.
लेटरपॅडवर “बालरोग तज्ञ’चा उल्लेख खोटा…
रामलावण्य हॉस्पीटल चालविणारे डॉ. रामदास काळे हे आयुर्वेद क्रोभारभृत्य या विषयात पदवीत्तर पदवीधरक असून त्यांच्या लेटरपॅडवर एम. डी (बालरोग तज्ञ) असा खोटा उल्लेख आढळला आहे. यासह अन्य बाबी हॉस्पिटलचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 1949 नुसार हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यासाठी पुरेशा असल्याने आवश्यक बाबींचा पूर्तता करेपर्यंत परवाना रद्द करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.