कार्तिकीवारीत पैसे मोजणाऱ्या स्वयंसेवकाकडून चोरी
आळंदी – आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कार्तिकी वारीत दानपेटीतील पैसे मोजण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासाहेब विष्णू पाटील (रा.वाळवा) याच्यावर दानपेटीतील पैशांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी पोलीसांनी सांगितले की, याप्रकरणी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर यांनी फिर्याद दिली आहे. आळंदीतीत नुकतीच कार्तिकी वारी भरली. आळंदी देवस्थानमध्ये भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या दक्षिणेच्या रकमेची मोजणी करण्यासाठी कार्तिकी वारीत दरवर्षी स्वयंसेवक नेमले जातात. दरम्यान, ओरापी पाटील याने स्वयंसेवक म्हणून संस्थानकडे अर्ज केला होता. दि. 20 नोव्हेंबरपासून आरोपी पाटील आळंदी देवस्थानमधे पैसे मोजण्यासाठी आला होता. तर, कार्तिकी एकादशीच्या दिवशी (दि.23) देवस्थानचे सह व्यवस्थापक बाळासाहेब भंडारकौठे यांनी वीर यांना सांगितले की, दानपेटीतील पैसे ज्या ठिकाणी मोजतात त्या खोलीतील सिसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये आठच्या सुमारास आरोपी पाटील याने त्याच्या मांडीखाली पाचशे रूपयाच्या सहा नोटा ठेलेल्या दिसल्या. या नोटा त्याने मोजणी झालेल्या ट्रेमध्ये ठेवल्या नाहीत.
दरम्यान, यात्रा सुरू असल्याने देवस्थानने याबाबत काही केले नाही. आरोपी पाटील याला तत्काळ पैसे मोजू नकोस व निघून जा, असे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले. त्यानंतर मात्र शहरात चोरीच्या घटनेची वंदता झाली. यामुळे देवस्थानला आरोपी पाटील विरोधात फिर्याद देणे भाग पडले. त्यानंतर मंगळवारी (दि.26) विश्वस्तांच्या बैठकीत सिसीटीव्ही फुटेज पाहून देवस्थानने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आरोपी पाटील विरोधात तीन हजार रूपयांच्या अपहार प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
आणखी काही जण चोरीत सामील ?
देवस्थानमध्ये पैसे मोजण्यासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तीवर एवढा विश्वास ठेवला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाटील बरोबर आणखी काही व्यक्ती चोरीप्रकरणात सामील आहेत का? याची माहिती पोलीस आणि देवस्थान घेत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून अशाच पद्दतीने समाधीवरील पैसे दानपेटीत न टाकता खिशात टाकणाऱ्यांचाही शोध घेतला जात असून देवस्थानच्या सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षक यांचीही चारिात्र्य पडताळणी करूनच नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
देवस्थानच्या कार्यवाहीचे स्वागत…
दानपेटीतील पैशावर डल्ला या आशयाचे वृत्त आल्यानंतर देवस्थानमध्ये झालेल्या चोरीची शहरात चर्चा झाली. यामुळे देवस्थानला दखल घेत आरोपी पाटील विरोधात फिर्याद द्यावी लागली. गुन्हा घडल्याच्या दिवसानंतर तब्बल चौथ्या दिवशी गुन्हा दाखल केल्याने उशीरा का होईना, देवस्थानने कडक कार्यवाहीची भूमिका घेतल्याने आळंदीकरांमधून देवस्थानच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.