आयुक्त गायकवाड : पोलीस आणि व्यापाऱ्यांचे एकमत झाल्यानंतरच निर्णय
पुणे – शहरातील व्यापारी पेठांच्या परिसरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागातील व्यावसाय अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत; यातून या भागातील व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवल्याने व्यावसाय सुरू करण्याची मागणी होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका आणि पुणे व्यापारी महासंघाच्या बैठक तसेच प्रत्यक्ष जागेवर पाहणी सुरू आहे. त्यामुळे पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये एकमत झाल्यानंतरच दुकाने उघडण्याचा आदेश महापालिका काढणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
शहरातील सोमवार पेठ, भवानी पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, गुरूवार पेठ भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केलेले आहेत. तर या भागात जाण्याचे मुख्य रस्तेही पोलिसांनी पत्रे ठोकून बंद केले असून त्या ठिकाणी बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. याच भागात सर्वाधिक व्यावसायिक दुकाने आहेत.
तीन महिन्यांपासून ती बंद आहेत. शहरातील इतर भागातील व्यावसायिकांना कच्चा माल मिळण्यातही अडचण होत असून व्यावसायिकांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुणे व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत, दुकाने सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून याबाबत बैठका सुरू आहेत. त्यात पोलिसांनी कंटेन्मेंट झोन मध्ये रूग्न असलेले भाग सील करण्यास असमर्थता दर्शविली आहे.
दरम्यान, हे भाग प्रामुख्याने मुख्य रस्त्यांना जोडतात. त्यामुळे मुख्य रस्ता खुला केल्यास या रस्त्यांच्या जोडणाऱ्या रस्त्यांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना 30 ते 40 ठिकाणी स्वतंत्र बॅरीकेडींग करावे लागेल. तसेच जादा मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे मुख्य रस्ते खुले करण्यास पोलिसांचा विरोध आहे. परिणामी, व्यापारी पेठा उघडण्याबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे याबाबत तोडगा निघताच, महापालिका तातडीनं या भागातील दुकाने उघडण्याचे आदेश काढणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.