सातारा – ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. रुपेश महादेव सावंत (वय 40, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे डेंग्यूने मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, सावंत मार्केट यार्डमध्ये मजुरी करत होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते तापाने आजारी होते. त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी थोडे बरे वाटल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, मंगळवारी दुपारी अचानक त्यांना पुन्हा ताप आला. त्यांना धाप लागून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.