– प्रमोद ठोंबरे
बारामती – वाहन उद्योगात मोठ्याप्रमाणात मंदीचे वातावरण असून त्याच्या झळा बारामती एमआयडीसीलाही बसल्या आहेत. बारामती एमआयडीसीत वाहन उद्योगातील अग्रगण्य पियाजिओ व्हेईकल्स आणि भारत फोर्ब्ज या कंपन्या असून त्यांना या मंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यांनी अनेक उत्पादने बंद केली असल्याने याचा थेट परिणाम लघु-मध्यम उद्योजकांना बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली आहे. तर दोन्ही कंपन्यांनी अद्याप कामगार कपात केली नसली तरी आपल्या नोकरीवर केव्हाही कुऱ्हाड कोसळू शकते या भीतीने लाखो कामगारांच्या मनात घर निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार काही निर्णय घेऊन वाहन उद्योगाला उभारी देणार की या कंपन्या डबघाईला येणार हे येणारा काळच ठरवेल.
सध्या, भारतीय अर्थव्यवस्था गटांगळ्या खाऊ लागली आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने दाखवले आहे. पण, बाजारपेठेतील वास्तव खूप वेगळे आहे. शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्र अतिशय सावध पवित्र्यात असून, उद्योजक नवी गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचे ढग गडद होताना दिसत आहेत. देशातील मंदीचा सर्वांत पहिला फटका ऍटोमोबाईल अर्थातच वाहन निर्मिती क्षेत्राला बसला आहे.
परिणामी या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या स्पेअर पार्ट तसेच टायर, स्टिल, रंगकाम, काच निर्मिती या सगळ्या क्षेत्रावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे आता सरकार ऑटोमोबाईल क्षेत्राला उभारी देण्यासाठी काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ही एक (चक्र) चेन असून दर पाच ते सहा वर्षांनी प्रत्येक क्षेत्रात हा बदल ठळकपणे दिसून येतो. पण हा बदल रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. मंदीचा परिणाम खूप जाणवत आहे. वाहन उद्योगावर अवलंबून असलेले लघु व मध्यम उद्योजकही अडचणीत आले आहेत. बांधकामासह अन्य क्षेत्रांतही मंदी असल्याने अर्थव्यवस्था मंदावली आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यावर उपाय करता येणे शक्य आहे. सरकारने थेट गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक वाढविल्यास रोजगार वाढतील व मागणीही वाढेल.
त्याचबरोबर काही धोरणात्मक बदल करून उद्योगांना आवश्यक सवलतीही द्यायला हव्यात. हे बदल वेळेत न केल्यास त्याचा घातक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बारामती एमआयडीसीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
उद्योजकांनी मानसिकता बदलणे गरजेचे
मागणी नाही, असे म्हणणाऱ्या उद्योजकांनी स्वत:ची मानसिकता बदलली पाहिजे. मागणी नसली, तरी आयात थांबलेली नाही. विक्री होत असल्यानेच बाकीचे देश भारतात निर्यात करत आहेत. त्याला देशांतर्गत पर्याय शोधण्याची गरज आहे. त्याचबरोबर निर्यातवाढीसाठीही उद्योगजगताने सतत प्रयत्नशील असले पाहिजे.
बारामती एमआयडीसीत मंदीचा 100 टक्के फटका बसला आहे. पियाजिओ कंपनी तर शनिवारी सुट्टीही देत आहे. अनेक उत्पादनेही त्यांनी बंद केली आहेत. याचा थेट फटका छोट्या उद्योग धंद्यांना बसला आहे. कंपनीने कामगार कपात केली नसली तरी ते कामगाराला कायमस्वरुपी तत्वार घेत नाही. त्यामुळे साहजिकच प्रत्येक कामगाराच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम आहे.
– प्रमोद काकडे, अध्यक्ष बारामती चेंबर ऑफ कॉमर्स
…तर मंदीचे मळभ दूर होईल
– गृह आणि वाहनांसाठी ज्यापद्धतीने कर्जाचे व्याजदर आहे त्याच पद्धतीने कंपन्यांसाठी व्याजदर देणे गरजेचे आहे
– एमआयडीसीसाठी खास प्लॉट राखीव ठेवणे गरजेचे
– कंपन्यांसाठी वातावरण निर्मिती गरजेची
– पाणी, रस्ते, इतर सोयी-सुविधा पुरवणे गरजेचे
– कंपन्यांवर टाकलेले निर्बंध कमी करणे गरजेचे