कार्यकर्त्यांची विचारपूस करत दिला आठवणींना उजाळा

सेल्फीचा मोह

सध्या जमाना सोशल मीडियाचा आहे. धनगरवाड्यावरदेखील अनेक अँड्रॉईड मोबाईल आहेत. लहान शाळकरी मुलांनी यावेळी काकांच्यासोबत सेल्फी काढण्याचा हट्ट धरला. काकांनीसुध्दा मुलांचा तो हट्ट पुरवला. यावेळी आपण काही तरी मिळवल्याचा आनंद त्या निरागस चेहऱ्यावर दिसून आला.

कराड  – ना कोणती निवडणूक… ना कोणता वैयक्‍तिक अथवा सार्वजनिक कार्यक्रम… भविष्यातील निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी आले असावेत तर मतदारसंघ बदललेला…सोबत कोणत्याही प्रकारच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा नाही… गाड्यांची रेलचेल नाही… ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्या ठिकाणी आपण येणार आहोत याची पुसटशी कल्पनाही नाही… अशातच सायंकाळच्या रम्य वेळी त्यांचे आगमन झाले. ते आले… त्यांनी पाहिले… आणि त्यांनी जिंकले… असेच याबाबत म्हणावे लागेल. माजी सहकारमंत्री विलासराव पाटील (काका) यांच्या बाबतीत हे वर्णन आहे. विशेष म्हणजे या सदिच्छा भेटीवेळी एकही राजकीय पुढारी काकांच्या सोबत नव्हता. दरम्यान, काकांनी या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा उभयता पोशाख देवून सत्कार केला.

काही दिवसापूर्वी विलासकाका आणि त्यांचा नातू यांनी पाटण तालुक्‍यातील धनगरवाडा (काळगांव) या ठिकाणी भेट दिली. कसलाही गाजावाजा नाही, कोणताही कार्यक्रम नाही असे असताना अचानक विलासकाका आलेले पाहून धनगरवाड्यावरील अबालवृध्द भारावून गेले. सर्वजण हरखून गेले. काय करावे हे समजत नव्हते. धनगरवाड्यामध्ये असलेल्या छोट्याशा मंदिराबाहेर ते बसले होते. बसल्यानंतर जुन्या आठवणींचा फड रंगला. या विभागाने पाटण मतदारसंघ दक्षिणमध्ये जाण्यापूर्वी एकमुखी साथ दिली आहे. काकांनी देखील या भागातील मुलभूत सुविधा सोडवत असताना शाश्‍वत विकास करण्याचे काम केले आहे. सुमारे 20 वर्षापूर्वी हा बदल झाला आहे. असे असतानादेखील जुन्या लोकांच्या आठवणीमुळे त्यांना भेटण्यासाठी काका या ठिकाणी आले होते. प्रत्येकाची आवर्जून ते विचारपूस करत होते. अमका कुठे आहे. तमका कुठे गेला आहे. हा दिसेना. तो दिसेना अशी प्रत्येक घरातील नावाला आणि त्याच्या परिवाराला काका ओळखत होते.

या छोट्याशा वाडी-वस्तीवर ऊर्जा निर्माण करण्यासाठी लोकांनी माझ्यावर केलेले प्रेम व्यक्‍त करण्यासाठी आपण याठिकाणी आलो आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. निस्वार्थ भावनेने लोकांना खास भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आहे अशी प्रतिक्रिया विलासराव पाटील (काका) यांनी व्यक्‍त केली. बऱ्याच कालावधीनंतर काका गावी आले आहेत. हे पाहून त्यांनी काकांचा सत्कार घेण्याचे ठरवले. हे कळताच काका म्हणाले, “मी सत्कारासाठी नाही तर फक्‍त तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे, त्यामुळे मी हा सत्कार स्वीकारणार नाही.’ या वयात देखील काका अतिशय उत्साहाने लोकांशी बोलत होते.

काही अडचणी असतील तर मला नि:संकोच सांगा असे म्हणत धीर देत होते. पूर्वी विकासकामे करत असताना अडचणी कशा आल्यात आणि त्यावर आपण कशी मात केली यावर चर्चा करत होते. त्यासाठी काय काय करावे लागले याबाबत बोलत होते. फक्‍त आणि फक्‍त भेट घेण्यासाठीच मी आलो आहे असे वारंवार काका सांगत होते. यावेळी भैरु लांबोर, ठकू अनुसे, धोंडिबा येडगे, कोंडिबा येडगे, नवलोजी झोरे, जयराम अनुसे, गंगाराम अनुसे, जयवंत येडगे, देवा लांबोर, दगडू लांबोर, हिंदूराव मोहिते, गणेश मोहिते धनगरवाडा येथील ग्रामस्थ, लहान मुले, महिला, वृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमारे 20 घरांची वस्ती असलेल्या या छोट्याशा वस्तीमध्ये प्रत्येक घरात पाणी, प्राथमिक शाळा, वीज अशा सुविधा काकांनी केल्या आहेत. शिवाय कराड ते धनगरवाडा अशी एसटी देखील सुरु केली होती. (काही कारणामुळे सध्या ती बंद आहे.), अशा अनेक गोष्टी काकांनी केल्यामुळे या वस्तीवरील जनता काकांना खऱ्या अर्थाने “देवमाणूस’ मानते. आमच्यासाठी काका आमचे विकासपुरुष आणि दैवत आहेत. अशा भावना येथील वयोवृध्द लोकांनी व्यक्‍त केल्या. सुमारे 15 ते 20 वर्षानंतर विलासराव पाटील (काका) या ठिकाणी खास विचारपूस करण्यासाठी येवून गेले ही बाबही सुखावणारी होती. काकांच्या येण्यामुळे अनेक सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. केवळ राजकारण आणि निवडणुकीपुरते लोकांना भेटायला जात असलेल्या सध्याच्या पुढाऱ्यांनी काकांचा हा माणुसकी जपण्याचा आणि नाते टिकवण्याचा आदर्श घ्यायलाच हवा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here