कसबा मतदारसंघात मतदारांमध्ये निरुत्साह

केवळ 52 टक्‍के मतदान : किरकोळ प्रकार सोडता प्रक्रिया शांततेत

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघात एकूण 52.0 टक्‍के मतदान झाले. या भागात सकाळी 11 वाजेपर्यंत केवळ 9.6 टक्‍के मतदान झाले होते. मात्र, दुपारनंतर मतदारांनी घराबाहेर पडत काही प्रमाणात मतदानाचा टक्‍का वाढवला. मतदारसंघात काही मतदान केंद्रांवर मशीन बंद पडणे, व्हीव्हीपॅटची बॅटरी नादुरुस्त होणे यासारखे किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.

कसबा मतदारसंघ शहराचा मध्यवर्ती भाग आहे. या ठिकाणी अठराहून अधिक पेठांचा समावेश असल्याने शहरातील राजकीयदृष्ट्या चर्चेचा मतदारसंघ आहे. मात्र, नेहमीच्या तुलनेत या निवडणुकीतही मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत अवघे 12 ते 13 टक्‍के मतदान झाले होते. परिणामी, मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. या मतदार संघात दरवेळेप्रमाणे सायंकाळी 4 ते साडेचारनंतर मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करण्यास पसंती दिली. सायंकाळी साडेपाचनंतर अनेक मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. या मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 9 टक्‍के मतदान झाले होते. त्यामुळे, सकाळच्या सत्रात मतदान कमी झाल्याचे दिसून आले. दुपारी 3 वाजेपर्यंत 26.33 टक्‍के झाले होते. तर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 36.9 टक्‍के झाले होते.

भवानी पेठेतील रामोशी गेट येथील सावित्रीबाई फुले शाळा व रफी अहमद किडवाई शाळा, अग्निशमन दलाजवळील सावित्रीबाई फुले सभागृह, घोरपडी पेठेतील महात्मा गांधी विद्यालय, गणेश पेठेतील गुरुनानक शाळा आणि भिकुबाई मेनकुदळे सभागृहातील मतदान केंद्रांवर सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. यासाठी, जे मतदार सायंकाळी 6 वाजेपर्यंत आले होते त्यांना टोकण देण्यात आले होते. मतदारसंघात मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रात व्हिलचेअर उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच, मतदारांना घेऊन जाण्यासाठी कर्मचारीदेखील नियुक्‍त करण्यात आले होते. त्यामुळे, वृद्ध मतदारांना मतदान करणे सोयीचे झाले. मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी काही मतदार केंद्रांच्या बाहेर शेड उभारण्यात आले होते.

कसबा मतदारसंघात 23 मशीनमध्ये बिघाड
कसबा मतदारसंघातील मतदान केंद्रातील 23 मशीनमध्ये बिघाड झाल्याने गोंधळाचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 15 ते 20 मिनिटांत तांत्रिक दोष दूर करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. याचबरोबर, क्‍यूआर कोडमुळे काही ठिकाणी मतदानासाठी विलंब लागल्याचे दिसून आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)