महाळुंगे इंगळेमध्ये मतदानासाठी दिवसभर रांगा

पावसाच्या उघडीपीने मतदानात उत्साह वाढला

महाळुंगे इंगळे – ऐन प्रचाराच्या अखेरच्या रणधुमाळीत सुरू झालेल्या परतीच्या पावसाने सोमवारी (दि. 21) मतदानाच्या दिवशी दिवसभर विश्रांती घेतल्याने सकाळपासूनच मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) व परिसरात पहावयास मिळाले. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसत होत्या.

महाळुंगे इंगळे व या परिसरातील नाणेकरवाडी, खराबवाडी, खालुंब्रे, येलवाडी, सांगूर्डी, कान्हेवाडी, मोई, निघोजे, चिंबळी तसेच वाकी, काळूस, भोसे या भागतील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासून नागरिकांनी मतदानासाठी तोबा गर्दी केली होती. खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश नामदेव गोरे यांनी त्यांच्या पत्नी मनीषा गोरे यांच्यासमवेत येथील झित्राईमळामध्ये मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात मतदानाचा
हक्क बजावला.

महाळुंगे इंगळेमध्ये उत्साहात मतदान झाले. भोसेसह अन्य केंद्रांवर ओळखीचे पुरावे मतदारांनी न आणल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ घातला. रविवारी सायंकाळपर्यंत संततधार पावसाने सोमवारी चांगलीच उघडीप दिल्याने खराबवाडी, महाळुंगे इंगळे, रासे, भोसे, आगरकरवाडी, पठारवाडी, काळूस, शेलपिंपळगाव आदि भागात सकाळीच मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रावर सकाळी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारपर्यंत अनेक ठिकाणी 40 ते 45 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने या भागात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

मतदान करणारी कानपिळे यांची तिसरी पिढी – 
चाकण येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत येथील जुन्या पिढीतील 96 वर्षांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हभप एकनाथ राणोजी कानपिळे यांच्यासमवेत त्यांचा मुलगा उद्योजक भरत कानपिळे, सून सुनिता, नातू पंकज व प्रशांत कानपिळे यांनी तिसऱ्या पिढीसह आपला मतदानाचा हक्क बजावला.

Leave A Reply

Your email address will not be published.