चिखलातून वाट काढत मतदान

कोपरगाव – मतदारसंघात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे मतदान केंद्र आणि परिसर चिखलमय झाला होता. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाताना चिखलातून वाट काढीत मोठी कसरत करावी लागली. या चिलखातून मार्ग काढीत मतदान मतदारांना करावे लागले. ढगाळ वातावरणामुळे अंधार पडला होता. सहाजिकच मतदान केंद्रांवर वीजेची व्यवस्थान नसल्याने कर्मचाऱ्यांना मोबाइलच्या उजेडात मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागली.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. काही मतदान केंद्रावर सकाळीच गर्दी झाली. महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पती साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे यांनी जोडीने जाऊन सकाळी सव्वा सात वाजता कोपरगाव तालुक्‍यातील येसगाव वस्तीच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तर माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी देखील मतदान केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका चैताली काळे यांनी तालुक्‍यातील माहेगाव देशमुख या गावी सकाळी मतदान केले. तर गोदावरी दूध संघाचे चेअरमन व अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांनी संवत्सर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. नगराध्यक्ष व अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांनी कोपरगाव येथे मतदानाचा हक्क बजावत मतदान केले. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांनीही मतदानाचा हक्क बजावला. कोपरगाव शहरातील महादेवनगर भागातील नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्र क्रमांक 137 वर मतदानासाठी मोठ्या रांगा पहावयास मिळाल्या.

पहिल्या तासात तब्बल शतकी पार मतदान करून या केंद्राने उच्चांक गाठला. काही ज्येष्ठ नागरिक आपल्या काठीचा आधार घेत सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावून तरुण मतदारांना मतदान करण्याची चालना दिली. यावेळी आमदार कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, आपला विजय निश्‍चित आहे. केंद्रात आणि राज्यांमध्ये भाजप सरकारने जनहितासाठी केलेल्या कामाचा फायदा मला मतदारसंघांमधून होणार आहे. त्यामुळेच माझा विजय निश्‍चित होईल. राष्ट्रवादीचे उमेदवार व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावा सर्व नागरिकांना पवित्र लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

दरम्यान मतदारसंघांमध्ये आठ मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने आठ ठिकाणी मतदान यंत्रात बदल करून नवे मतदान यंत्र लावण्यात आले. बिघाड झालेले मतदान केंद्रात डाऊच खुर्द- मतदान केंद्र क्रमांक 205, पोहेगाव- 219, मुर्शदपूर – 148, 150, कोकमठाण – 178, मढी -168, सुरेगाव- 29, कोपरगाव शहर – एसएम महाविद्यालय 113 यांचा सामावेश आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 64 हजार 832 मतदार आहेत. त्यात पुरुष 1 लाख 35 हजार 156, महिला 1 लाख 29 हजार 670 व इतर 6 मतदार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत 32.36 मतदान झाले.

त्यामध्ये पुरुष 49 हजार 800 (36.85%), महिला 35 हजार 871( 27.66%). 85 हजार 671(32.35%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 3 वाजेपर्यंत 49.96 टक्‍के मतदान झाले. त्यात पुरुष 70 हजार 449 (52.12 %), महिला 61 हजार 872 (47.71%) असे 1 लाख 32 हजार 321 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

कौल कुणाकडे याकडे उमेदवारांचे लक्ष
शहरातील 100 नंबरचे मतदान केंद्र लक्षवेधक ठरले. या केंद्रावर सर्व गुलाबी-गुलाबी दिसत होते. दोन दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे परिसरात थंड होते. त्यातच या मतदान केंद्रावर काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचार गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केला होत्या. मतदान केंद्रांमध्ये गुलाबी रंगाचे फुलांची सजावट करून सखी महिला मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. येथे काम करणाऱ्या सर्व महिला सुरक्षेसाठी महिला पोलीस असल्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारांकडे वेधले जात होते.

मतदान करण्यासाठी येणाऱ्या महिला यासुद्धा गुलाबी साड्या घालून मतदान करण्यासाठी आल्याने या मतदान केंद्रावर ती अधिकच रंगत आली होती. महिला सखी मंच कर्मचारी राजश्री पिंगळे, कल्पना निंबाळकर, प्रतिभा राऊत, संध्या डोखे, सविता जमधडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा काळे, मतदार वैशाली बालाजी आंबोरे यांच्या गुलाबी पेहराव्याने मतदान प्रक्रिया सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.