पुणे – खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. आज संध्याकाळी ५.०० वाजता खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांचा पाणीसाठा १७.२१ टीएमसी झाला आहे. महापालिकेस शहरासाठी महिन्याला सव्वा टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. हे पाणी पुढील वर्षभर पुरेल एवढे आहे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.