कोल्हापूर : सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या शिक्षण आणि सामाजिक उन्नतीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सेवा बजावित असलेले श्री. सुजित मुंढे यांनी मराठी भाषेमध्ये अनुवाद केलेले ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५’ या मराठी अनुवाद पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर येथील जुना राजवाडा येथे मा. श्री. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते आणि मा. श्री. अभय जायभाये व मा. श्री. श्रीपाद देसाई यांच्यासह छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन येथील पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करून संपन्न झाले.
या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने मा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी या मराठी अनुवादाबद्दल विशेष कौतुक केले आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास आणि प्रशिक्षण हा एक महत्वपूर्ण घटक असून सदर मराठी अनुवाद पुस्तकाचा राज्यभरातील जनतेला निश्चित फायदा होईल असे मत व्यक्त केले.
तसेच शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर येथील सहायक प्राध्यापक मा. श्री. श्रीपाद देसाई यांनी सदरचा कायदा मराठीतून उपलब्ध होण्यापूर्वी फक्त इंग्रजी, हिंदी आणि ओडिया या भाषेमध्ये सर्वसामान्यांना उपलब्ध असल्याची बाब अधोरेखित केली आणि सदर पुस्तकाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच सर्वसामान्यांना या कायद्याचे मातृभाषेतून समग्र आकलन होण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनाची राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक प्राधिकरणे यांची कार्यप्रणाली जाणून घेण्यास विशेष मदत होईल असे मत व्यक्त केले.
दरम्यान, श्री मुंढे यांनी शिवाजी विद्यापीठात सेवा बजावत असताना विशेषतः विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, मा. कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर आणि वित्त व लेखाधिकारी श्री व्ही. टी. पाटील तसेच विद्यापीठ प्रशासनाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने सदर अनुवाद पुस्तक निर्मिती करू शकलो असे मत व्यक्त करून सदर पुस्तक निर्मिती करीता मार्गदर्शन करणाऱ्या इतर सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
सदर प्रकाशन कार्यक्रमास मा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालक श्री. अभय जायभाये आणि श्री विवेक जाधवर व श्री संग्राम मोरे तसेच शहाजी विधी महाविद्यालय येथील श्री श्रीपाद देसाई आणि छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.