रेशन दुकानदारांची कमिशन वाढ विचाराधीन -डॉ. विश्वजित कदम

पाणी पुरवठा संस्थांच्या ठिबक कार्यक्रमाबाबत प्रस्ताव द्या

कोल्हापूर(प्रतिनिधी) : रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करणे विचाराधीन असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा संस्थांनी मोठ्या प्रमाणात ठिबक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर क्षारपड विकास सहकारी संस्थांनीही क्षारपडमुक्त जमीन करण्यासाठीही कार्यक्रम राबविला आहे. याबाबतचा निधी मागणीचा सविस्तर प्रस्ताव द्यावा. निश्चितपणे यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सहकार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री डॉ. कदम यांनी आज जिल्हा पुरवठा विभाग आणि सहकार विभाग यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, साखर सहसंचालक नरेंद्र निकम, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर आदी उपस्थित होते.

जिल्हा पुरवठा अधिकारी   कवितके यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून पुरवठा विषयक कामकाजाची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी  देसाई यांनीही यावेळी आलेल्या तक्रारींची दखल घेऊन दोन महिन्यात 43 रास्त धान्य दुकानदारांवर कारवाई केल्याची माहिती दिली.

राज्यमंत्री डॉ. कदम यावेळी म्हणाले, शिवभोजन केंद्राची बिले देण्याबाबत तहसिलदारांना अधिकार देण्याचा चांगला विषय मांडला आहात, त्याबाबत सचिवांशी बोलून निर्णय घेतला जाईल. स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन वाढ करण्याची बाब विचाराधीन आहे. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. येणाऱ्या अडचणीबाबतही त्यांनी यावेळी विचारणा करून त्याबाबत माहिती घेतली.

पाणी पुरवठा संस्थांच्या ठिबक कार्यक्रमाबाबत निधी मागणीचा प्रस्ताव द्या

जिल्हा उपनिबंधक यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून सहकार विभागाचा आढावा दिला. राज्यमंत्री डॉ. कदम यावेळी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगले काम झाले आहे. विशेषत: पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा संस्थांनी मोठ्या प्रमाणात ठिबक संच बसविण्याचा कार्यक्रम राबविला आहे. हा चांगला प्रकल्प असून या संस्थांच्या ठिबक कार्यक्रमाबाबत तसेच त्यांच्या निधी मागणीबाबतचा सविस्तर प्रस्ताव द्या. शासन स्तरावर हा निश्चित मार्गी लावला जाईल. क्षारपड विकास सहकारी संस्थेने विशेषत: शिरोळ तालुक्यातील क्षारपड झालेली जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. या संस्थेच्या निधी मागणीबाबतही प्रस्ताव द्यावा.

यावेळी जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीची सद्यस्थिती, पीककर्ज,एफआरपी न दिलेले कारखाने व त्याबाबत सहकार विभागाने केलेली कार्यवाही, एकूण असणारे साखर कारखाने, त्यांची सद्यस्थिती आणि समस्या, जिल्ह्यातील सहकारी संस्था व बँका याबाबत सविस्तर आढावा घेतला.

लोकांना जेवू घालून पुण्याचे काम करत आहात…

राज्यमंत्री डॉ. कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या शिवाज हॉटेल येथे भेट देवून तेथील शिवभोजन केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्या ठिकाणी असणाऱ्या लाभार्थ्यांशी संवाद साधून जेवणाच्या दर्जाबाबत विचारणा केली. ‘गोरगरीब-सर्वसामान्य लोकांना जेवायला घालून आपण पुण्याचे काम करत आहात. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी सदैव राहणार आहेत. हे काम असेच प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवा,’ अशा शुभेच्छा राज्यमंत्री डॉ. कदम यांनी यावेळी केंद्रचालकांना दिल्या. त्याचबरोबर सर्वच शिवभोजन केंद्रातील जेवणाच्या दर्जाबाबत लाभार्थ्यांकडून प्रतिसाद घ्यावा, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.