पुणे : भवानी पेठेतील क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या स्मारकाच्या ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्याने तसेच काही असामाजिक तत्वाच्या नागरिकांकडून या ठिकाणी चक्क दारू पिण्यासाठी या भागाचा वापर केला जात असल्याने भानगिरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भानगिरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार स्त्री शिक्षणाचा जागर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
स्मारकाच्या अनुषंगाने त्यांचे विविध विचार समाजात रुजू करण्याचे मोठे कार्य सुरू असताना गेल्या काही दिवसापासून भवानी पेठ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच काही असामाजिक तत्वे सामाजिक सलोखा बिघडावा या उद्देश्याने तेथे मोठ्या प्रमाणावर बाटल्यांचा खच, दुर्गंधीचे साम्राज्य आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हे विद्येचे व ज्ञानाचे आदान प्रदान करणारे ज्ञानमंदिर ठरावे यासाठी पुणे महानगरपालिका सातत्याने प्रयत्नरत असली पाहिजे. त्यामुळे तात्काळ फुले स्मारकाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तिथे सुरक्षा रक्षक नेमून त्या परिसरात कोणतेही असमाजिक तत्वे सक्रिय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.