पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याला गुरूवारी (दि.26) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ललित पाटीलच्या पलयानप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन पकडले होते. या प्रकरणात ललित पाटील सामील असल्याचे तपासात उघडकीस आले होते. ससून रुग्णालयातून ललित पसार झाला. ललितला पसार होण्यास कोणी मदत केली याचा तपास करण्यात येत होता. तपासात विनय याचा मोटारचालक दत्ता डोके याला अटक करण्यात आली होती. त्याने ललितला ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर मोटारीतून बाहेर सोडले होते.
तसेच त्याच्याकडून 10 हजार रुपये घेतले होते. ललितच्या दोन मैत्रिणींना अटक करण्यात आली होती. ललित रुग्णालयात असताना तो बाहेर फिरत असल्याचे दिसून आले होते. त्याची अनेकांनी भेट घेतली होती. दरम्यान विनय अऱ्हाना याचा चालक डोके याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता विनय या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बुधवारी विनय याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले.