पिंपरी – हल्ली प्रत्येक गोष्टींची जाहिरात केली जाते. त्यात अनेक फुकटे जाहिरातदार भिंती, बस थांबे यांचा वापर करून त्यांचे विद्रुपीकरण करतात. त्यांनी मेट्रोचे खांबही सोडले नाहीत. अशा फुकट्या जाहिरात दारांवर आता कारवाई होणार आहे. मेट्रोच्या खांबावरील अनाधिकृत फलकांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.
पुणे मेट्रो प्रशासनाकडून पुण्यातील मेट्रोच्या मार्गावरील खांबांवरील अनाधिकृत फलकांवर कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच मेट्रो ही सार्वजनिक संपत्ती असून तिचे विद्रुपीकरण केल्यास 500 रुपये दंड व 6 महिने ते 10 वर्षे कारावासाची शिक्षा होईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. पुणे मेट्रोचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक हा मार्ग कार्यरत आहे. 1 ऑगस्टपासून पिंपरी चिंचवडच्या मेट्रोचे विस्तारीकरण होऊन ती सिव्हील कोर्टापर्यंत सुरू झाली आहे.
मेट्रोच्या उन्नत मार्गातील खांबांवर अनधिकृत फलक लावल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर वेळोवेळी कार्यवाही देखील करण्यात आली. परंतु, कारवाई करून देखील विद्रुपीकरण करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
मेट्रो ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तीचे विद्रुपीकरण होऊ नये, असा उद्देश आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मेट्रोच्या खांबावर जाहिरात केल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.