लखनौ: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकी देणारा संदेश पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आज चुनाभट्टी इथल्या एका रहिवाशाला अटक केली.
उत्तरप्रदेश पोलिस दलाच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कला गेल्या शुक्रवारी हा संदेश मिळाला.
व्हॉट्स ऍपवर हा धमकीचा संदेश पाठवणाऱ्याने योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. आदित्यनाथ हे एका विशिष्ट समाजासाठी धोकादायक असल्याचे या संदेशात म्हटले होते. बॉम्बस्फोटाने योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकीही या संदेशात दिली गेली होती.
या संदर्भत गोमतीनगर पोलीसांनी शुक्रवारी एफआयआर दाखल केला होता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना याबाबत सतर्क केले. हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.