मुंबई: संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. हा संस्कार आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी आज समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य नव्हते. तसेच लॉकडाऊन एकदम उठवणेही योग्य नसल्याचे, हळूहळू आपली आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणताना जपून पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. टाळेबंदी उठवताना काळजीपूर्वक सुरू केलेल्या गोष्टी गर्दी करून आणि बेशिस्तीने वागून पुन्हा बंद होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ठाकरे म्हणाले, हे सरकार अनेक प्रकारे राज्यातील जनतेला मदत करत आहे. रेशनकार्ड नसलेल्या लोकांना अन्नधान्य देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्र शासनाने आता मान्य केली आहे. तसेच शिवभोजन योजनेअंतर्गत 5 रुपये थाळी याप्रमाणे रोज लाखो थाळ्यांचे वितरण होत आहे. गोरगरिबांना जेवणाची सोय उपलब्ध होत आहे. उपचार, अन्नधान्याचे आणि जेवणाचे वितरण हाही मदतीचाच एक भाग आहे.
राज्य शासनाला या श्रमिकांचे ओझे नव्हतेच; परंतु मजूर घरी जाऊ इच्छित होते त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे 7 लाख मजूर 481 ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. यांच्या प्रवासी भाड्याची 85 टक्क्यांची रक्कम केंद्र सरकार राज्याला देईल तेव्हा देईल परंतु त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी 100 टक्के खर्च करत आतापर्यंत 85 कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली आहे. राज्याची रोज 80 ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ 30 ते 40 ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राज्यात 70 हजार उद्योगांना परवानगी दिली. त्यात 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत. सहा लाख लोक कामावर परतले आहेत. ग्रीन झोनमध्ये जिल्हांतर्गत एसटी आणि मालवाहतूक सुरुच आहे. खरीपाच्या हंगामाची पूर्ण तयारी करण्यात येत आहे. टाळेबंदीत शेती, शेतीविषयक कामे, कृषिमालाची वाहतूक, अवजारांची वाहतूक यावर कधीच बंदी नव्हती आणि राहणार नाही, शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.