मंत्रालयातील बैठकीनंतर मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एसटी बस आगार सुरू करण्याबाबत मुंबई मंत्रालयात बैठक होऊन येत्या तीन महिन्यात एसटी आगार सुरू केले जाईल, अशी माहिती कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने पाच कोटी रुपये खर्च करुन एसटी आगार तयार करण्यात आले; परंतु एसटी आगार सुरू होण्यासाठी विलंब होत असल्याने मंत्री वळसे पाटील यांच्या पुढाकाराने मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीसाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढील तीन महिन्यांमध्ये एसटी बस आगार सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. एसटी बस आगार सुरू करण्यासाठी प्रशासकीय अडचणी असल्यास परिवहन मंत्री यांचे आदेश घेण्यात यावे, असे परिवहन मंत्री यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये राजगुरूनगर आणि नारायणगाव एसटी बस आगारामधून बससेवा सुरू आहे. बससेवा कर्मचारी, अधिकारी वर्गासह मंचर बसस्थानाकडे वर्ग करण्यात याव्यात व तातडीने बस आगार सुरू करण्यात यावे, असे ठरविण्यात आले.