दापोडी, (वार्ताहर) – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी येथील बीआरटी बस थांब्याच्या समोरील पदपथाची दुरवस्था झाली आहे. येथील पदपथाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दापोडी परिसरात महामार्गाच्या बाजूने असलेल्या पदपथावर ठिकठिकाणी राडारोडा, कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग डोळझाक करत असल्याने पादचार्यांना पदपथावरून प्रवास करणे कठीण होत आहे. तसेच काही ठिकाणी पदपथाचे पेव्हिंग ब्लॉक निखळून पडले आहेत.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना पदपथावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य आणि स्थापत्य विभागाने येथील पदपथाची साफसफाई व दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.