पिंपळे गुरव, (वार्ताहर) – दापोडी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील व अग्रेसर भवन मंदिरासमोरील व भाजी मंडईकडे जाणार्या रोडच्या अगदी मधोमध महापालिकेच्या वतीने स्वच्छतागृह उभारले आहे. परंतु या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. येथील साफसफाई व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्वच्छतागृहाच्या आजूबाजूच्या परिसराची देखील दुरवस्था झाली आहे. सिमेंट काँक्रिटीकरण उखाडले आहे. आतील दरवाजे तुटलेले आहेत त्यामुळे नागरिकांना स्वच्छतागृहाचा वापर करताना अडचणी येत आहेत.
सुंदर बाग येथील अग्रेसन महाराज मंदिरासमोर व दापोडी येथील रेल्वे स्टेशन जवळील, मुतारी पूर्णतः तुटलेली आहे व त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुतारी तुटल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.