वारजे –महानगरपालिकेच्यावतीने वारजे माळवाडी येथील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात सुरू करण्यात असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डायलिसिस सेंटर व सोनोग्राफी, एक्सरे सेंटरचे लोकार्पण दि. 4 जानेवारी 2022ला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु, उद्घाटनाच्या दोन महिन्यानंतरही हे सेंटर सुरू झालेले नाही. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही हा प्रकल्प सुरू नसल्याने याचा काय उपयोग? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकल्पाचा एकूण किमतीा अंदाज काढून टेंडर काढण्यात आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यासाठी कंपन्या आल्या, कामही पूर्ण झाले. डायलिसिससाठी लागणाऱ्या मशनरी सुद्धा आल्या, डॉक्टर-नर्स यांचा ताफा ही तयार आहे. परंतु, डायलिसिस सेंटरसाठी आवश्यक असलेली ड्रेनेजलाइनची सुविधाच येथेनसल्याने सर्व यंत्रणा तयार असूनही डायलिसिस सेंटर सुरू करता येत नसल्याचे समोर आले आहे. केवळ, या कारणातून हे डायलिसिस सेंटर धुळखात पडले आहे. आज, तरी या सेंटरकडे रुग्ण आणि त्यांचे नोवाईक हेलपाटे मारत आहेत.
वारजे माळवाडी परिसरातील रुग्णांच्या सोयीकरीता सुरू करण्यात आलेले डायलिसिसची यांत्रिकी कामे पूर्ण झाली आहेत. काही किरकोळ कामे अजून सुरू आहेत. ती तातडीने पूर्ण करून लवकरच हे डायलिसिस सेंटर रुग्णसेवेसाठी खुले करू. – दिपाली धुमाळ, नगरसेविका, राष्ट्रवादी
डायलिसिस सेंटर सुरू नसल्याने लोकांची निराशा होत आहे. ड्रेनेज लाइनसाठी टाकी न करता महानगरपालिकेच्या मुख्य ड्रेनेज लाईनला जोडण्यात यावी, हा यावरचा कायमस्वरूपी तोडगा आहे. काम पूर्ण नसताना राष्ट्रवादीकडून उद्घाटनाची घाईच झाली. – किरण बारटक्के, माजी नगरसेवक, भाजपा
नगरसेवकाचा अर्थ तो त्या भागाचा सेवा करणारा लोकप्रतिनिधी असतो. सत्य परिस्थितीत सेवा करणारा न राहता काही जण त्या भागाचे मालक झाले आहेत. काही ठिकाणी फक्त विकासकामांचा दिखावा होत आहे. रंगरंगोटी, उद्घाटनांपलीकडे काही होत नाहीत. – कैलास दांगट, पदाधिकारी, मनसे
डायलिसिस सेंटरचे उद्घाटन होऊन दोन महिने झाल्यानंतर तेथे ड्रेनेज लाइनची सुविधा नसल्याने, ते नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. सुविधा नव्हती तर उद्घाटनाची घाई का करण्यात आली? आधी ड्रेनेज लाईन बसवणे गरजेचे होते. पालिकाच सुस्तावली आहे. – निलेश माझिरे, माथाडी कामगार सेना, मनसे