पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी माॅडेल) ना नफा ना ताेटा तत्त्वावर आठ ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरवर अवघ्या ४०० रुपयांत डायलिसिस करण्यात येत असून, गेल्या दाेन वर्षांत येथे तब्बल ६९ हजार ४९४ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात आठ ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यापैकी दोन सेंटरमधील मशिन महापालिकेच्या मालकीची आहेत. उर्वरित सहा सेंटर खासगी संस्थांना चालविण्यास दिली आहेत. सर्व डायलिसिस सेंटरमध्ये एकूण ५७ मशिन आहेत. त्यापैकी सर्वात जास्त व एकूण सेंटरच्या तुलनेत सुमारे ५० टक्के डायलिसिस कमला नेहरू रुग्णालयातील सेंटरवर झाले आहेत.
बदललेली जीवनशैली, खाण्याच्या बदललेल्या सवयी, मधुमेहाचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे किडनी विकार वाढले आहेत. त्यामुळेच किडनी निकामी हाेण्याचेही प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये साधारणपणे दरवर्षी एक लाख रुग्णांना किडनीचे आजार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी या रुग्णांना नियमितपणे डायलिसिस सेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.
किडनी निकामी झालेल्या रुग्णांना आठवड्यातून किमान तीन वेळा डायलिसिसची आवश्यकता भासते. यासाठी खासगी रुग्णालयात सुमारे दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो; परंतु महापालिकेच्या डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांना ४०० रुपये दराने डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरमध्ये गरीब आणि गरजू रुग्णांना डायलिसिससारखे महागडे उपचार अत्यल्प दरामध्ये उपलब्ध हाेतात. या प्रकल्पाअंतर्गत २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत ६९ हजार ४९४ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले आहे. – डॉ. भगवान पवार आरोग्य प्रमुख, महानगरपालिका