पिंपरी – जागतिक महिला दिनानिमित्त आज (दि. 8) भाजपाच्या वतीने शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो प्रवास करण्याची संधी असणार आहे. महिला दिनाच्या दिवशी मेट्रोची पहिली सफर सकाळी साडेसात वाजता सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना महापौर ढोरे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत मेट्रो दाखल झाली आहे. शहरामध्ये कोविड संक्रमणाच्या काळापासून ते आजतागायत महापालिकेच्या तसेच खाजगी रुग्णालयातील रुग्णालयीन व इतर फ्रंटलाइन महिला कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहे.
अशा सर्व रुग्णालयीन महिला कर्मचारी जसे की, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, वार्ड आया, पॅरामेडीकल स्टाफ, फ्रंटलाइन महिला कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना महिला दिनानिमित्त मेट्रोचा प्रवास मोफत असणार आहे. तसेच शहरातील ज्या महिला मेट्रो प्रवासासाठी इच्छुक आहेत त्या महिलांना ही मंगळवारी जागतिक महिला दिनानिमित्त भाजपाच्या वतीने संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध केली जाणार आहे असे महापौर ढोरे यांनी सांगितले.