पुणे – पुणे शहरात वाहन तोडफोडीचे सत्र पुन्हा एकदा सुरु झाले आहे. मागील दोन दिवसांत कात्रज आणि वारजे येथे वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामध्ये कात्रज येथे तब्बल 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर वारजे येथे वाहनांबरोबरच एटीएम आणि डेअरीची तोडफोड करण्यात आली. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यातील तीघे अल्पवयीन मुले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कात्रत परिसरातील जैन मंदिर, साई मंदिर जवळ टोळक्याने दहशत माजवून पंधरा गाड्यांची तोडफोड केली, यामध्ये तिन चार चाकी, सहा रिक्षा आणि सहा दुचाकींचा समावेश आहे. याप्रकरणी साहिल गणेश वायदंडे (23, रा. सच्चाई माता मंदिर), सागर संदिप शर्मा उर्फ भवते(20,रा. याच्या सह दोन विधी संघर्षित बालक ताब्यात घेतले आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे. रविवारी मध्य रात्री चार जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्यासाठी वस्तीमध्ये धुडगूस घालून गाड्यांची तोडफोड केली.
यामध्ये इंडिको, होंडा असेंट , मारूती सियाज या चारचाकी गाड्या कोयत्याने फोडण्यात आल्या. तोडफोड करून हे टोळके पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात ही तोडफोड वर्चस्व वादातून झाल्याचे लक्षात आले. दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार अभिजित जाधव आणि विक्रम सावंत यांना आरोपी तळजाई पठार परिसरात असल्याची खबर मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.
वारजेत एटीएम, दुध डेअरी आणि वाहनांची तोडफोड –
कर्वेनगर येथील कॅनोल रोड येथे तीन दुचाकीवरील पाच ते सहा जणांनी सोमवारी रात्री तीनच्या सुमारास दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. यामध्ये फिर्यादी अक्षय लालजी सातपुते (30, रा.कॅनोल रोड, कर्वेनगर) हे चारचाकी रस्त्याच्याकडेला लावून लघुशंकेला गेले असता, त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. यानंतर टोळक्याने आपला मोर्चा शेजारी लावलेल्या दुसऱ्या चारचाकी गाडीकडे वळवला. या गाडीची तोडफोड केल्यावर शेजारील एटीएमची काच आणि सणस डेअरीचा साईन बोर्डही तोडला.
यानंतर रहिवाशी निता खोपडे यांच्या कारची तोडफोड केली. त्या सदनिकेतून बाहेर येऊन ओरडल्या असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. जाताना त्यांच्या घराची काचही फोडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एच.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साळवी करत आहेत.