लोणी काळभोर (वार्ताहर) – आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने गावातील 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून अजून शंभर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
रोजंदारी करून आपला चरितार्थ चालवणाऱ्या या कुटुंबांवर उपासमारीची वेळ या लॉकडाऊनमुळे आलेली आहे. ही बाब महसूल कर्मचारी संजय जवळकर यांच्या लक्षात आली. त्यांनी अशा कुटुंबांची यादी तयार केली व तलाठी, ग्रामसेवक यांच्या मदतीने यांना मदत करण्यास सुरुवात केली. आळंदी म्हातोबा येथील मुस्लीम बांधवाना ही बाब समजली. नुराणी मस्जिदच्या वतीने त्यांनी परिसरातील 50 कुटुंबांना दररोजचा लागणारा किराणा, धान्य वाटप करण्याचा निर्णय घेऊन महसूल प्रशासनाच्या सहयोगाने तो वाटण्यात आला.
महसूल प्रशासनातर्फे तसेच आळंदी म्हातोबा येथील ग्रामस्थांच्या मदतीने परिसरातील आत्तापर्यंत 250 कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पुरवठा आम्ही करत आहोत. हा काळ कठीण आहे. अनेक कुटुंब रोजंदारीवरील असल्याने अनेकांचे खाण्याचे हाल आहेत. अशा सर्व कुटुंबांची माहिती घेऊन आम्ही मदतीचा प्रयत्न करत आहोत.
-योगिराज कणीचे, तलाठी आळंदी म्हातोबाची