सुनीता शिंदे
कराड – कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व सत्ताधारी जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून असलेला दुरावा आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या मध्यस्थीने संपुष्टात आला. त्यामुळे कराड पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी शुक्रवारी बिनविरोध झाल्या.
जयवंत पाटील व राजेंद्रसिंह यादव यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून दुरावा आला होता. गेल्या मासिक सभेत उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सवतासुभा मांडल्याने सत्ताधारी जनशक्ती आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर विषय समिती सभापती निवडीकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. या निवडींमध्ये काय होणार, याची उत्सुकता असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून पालिकेत गर्दी होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या बैठकांमध्ये पाटील व यादव यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याने विषय समित्यांच्या निवडी कोणताही वाद न होता सुरळीत झाल्या.
कराड पालिकेत जनशक्ती आघाडीचे सोळा सदस्य असून त्यांची सत्ता आहे. अपक्ष नगरसेविका कश्मिरा इंगवले यांचा जनशक्तीला पाठिंबा आहे. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ 17 आहे. या आघाडीत अरुण जाधव, राजेंद्रसिंह यादव व जयवंत पाटील यांच्या गटांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. या आघाडीतून उपनगराध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. गेली तीन-साडे तीन वर्षे पाटील हे पद उपभोगत आहेत.
आता शेवटच्या दीड वर्षात इतर कोणाला संधी मिळावी, अशी नगरसेवकांची इच्छा असल्याने जयवंत पाटील व नगरसेवकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्यामुळे काही नगरसेवकांनी पाटील यांच्यापासून फारकत घेतल्याने पाटील यांच्याबरोबर केवळ पाच नगरसेवक उरले होते. विधानसभा निवडणुकीत जनशक्ती आघाडातील नगरसेवकांनी एकाच पक्षातील उमेदवाराला पाठिंबा दिला होता. प्रचारात ते फक्त शरीराने एकत्र दिसत असले तरी मनाने एकत्र नसल्याची चर्चा होती. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पालिकेच्या मासिक सभेत जयवंत पाटील यांनी आपल्या पाच सदस्यांसाठी वेगळी आसनव्यवस्था करण्याची मागणी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे केली होती.
त्यावेळी राजेंद्रसिंह यादव व जयवंत पाटील यांच्यातील बिघाडी उजेडात आली होती.
त्यानंतर पालिकेच्या अनेक कार्यक्रमांना जयवंत पाटील अनुपस्थित होते. त्यामुळे भविष्यात हे दोघे एकत्र येतील का, अशी शंका नागरिकांना होती. त्यामुळे विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे साऱ्यांचे लक्ष होते. जनशक्तीच्या प्रमुखांनी अंतर्गत मतभेद दूर केल्याने विषय समित्यांच्या निवडीसाठी जनशक्ती आघाडीचे सर्व नगरसेवक एकत्र दिसले.
पाटील गटाकडे एकच सभापतिपद
पालिकेच्या विषय समितीच्या सात व स्थायी समितीच्या तीन अशा एकूण दहा समित्यांच्या कारभाऱ्यांच्या निवडी शुक्रवारी झाल्या. राजेंद्रसिंह यादव व जयवंत पाटील यांच्यातील मतभेद मिटविण्यात जनशक्ती आघाडीच्या प्रमुखांना यश आले असले तरी जयवंत पाटील गटाला एकच सभापतिपद नगरसेवकांना देण्यात आले आहे. उर्वरित समित्यांच्या सभापतिपदी राजेंद्रसिंह यादव यांच्या गटाच्याच नगरसेवकांची वर्णी लागली आहे.