सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी कार्यक्रम
पुणे – अवघ्या सात वर्षे वयाच्या लेखकाने जागतिक शांततेसंबंधी विषयावर पुस्तक लिहिले असून, त्यावर त्याचेच व्याख्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील सभागृहात येत्या सोमवारी (दि.6) सकाळी 11 वाजता होणार आहे.
सुबर्नो बारी असे या लेखकाचे नाव आहे. त्याचे आई-वडिल बांगलादेशमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत. सुबर्नो हा जन्मत: बुद्धिमान आहे. तो केवळ सहा महिन्यांचा असताना पूर्ण वाक्ये बोलू लागला होता. दोन वर्षांचा असताना गणित आणि विज्ञानातील प्रश्न सोडवू शकत होता.
अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याच्या या कामगिरीची दखल घेतली आणि त्याला “लेटर ऑफ रेकग्निशन’ दिले. सुबर्नो याच्या गणित व विज्ञानातील प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेबद्दल हार्वर्ड विद्यापीठानेही असे पत्र देऊन त्याचा सन्मान केला आहे. सुबर्नो याने जागतिक शांततेबाबत “द लव्ह’ हे पुस्तक लिहले आहे. विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात या पुस्तकावर तो स्वत: बोलणार आहे आणि श्रोत्यांशी संवाद साधणार आहे.