आपत्ती निवारणासाठी जिल्हा व्यवस्थापन सज्ज

वीर अन्‌ तारळी धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

सातारा – जिल्ह्याच्या पश्‍चिमेला पावसाचा जोर वाढला असून धरणांच्या पाणीसाठ्यातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीर आणि तारळी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापन सज्ज झाले आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी वीर धरणातून 13 हजार क्‍युसेक तर तारळी धरणातून 2 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर नद्यांमधून देखील चार ते पाच हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. येत्या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.

त्यामुळे उर्वरित धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील छोटे पूल पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल विभागाच्या सहकार्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात कराड आणि वाई या ठिकाणी दोन बोटी उपलब्ध करून दिल्या आहेत.

बोटींचा ताबा स्थानिक नगरपालिकेकडे देण्यात आला असून बोट चालविण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर लाईफ जॅकेट, दोरी, सर्च लाईटचे वितरण करण्यात आले आहे. तसेच पाणी साठण्याचे प्रकार घडल्यास त्याचे निवारण करण्यासाठी कराड, वाई, सातारा, फलटण नगरपालिकांना फ्लिोंटंग पंपचे वितरणही करण्यात आले आहे

दरम्यान, धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नदीकाठची धोकादायक अथवा अतिक्रमण केलेल्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर छोटे पूल पाण्याखाली जातात. अशा वेळी प्रशासनाच्या वतीने संबधित ठिकाणी पोलीसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, अतिधाडसी लोक पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतात. असे धाडस नागरिकांनी करू नये. त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे उपसा मोटारी खराब होण्याची शक्‍यता असते. त्याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, असे देखील आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वीच पुराचा अंदाज

दरम्यान, वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याची माहिती आकाशवाणीवरून दिवसांतून चार ते पाच वेळा प्रसारित करण्यात येते. त्याचबरोबर येत्या दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण वाढले तर संभाव्य पूर परिस्थितीचा अंदाज हा व्यवस्थापनाला दोन दिवसांपूर्वी येत असतो. त्यासाठी कराड आणि वाई येथील नदीकाठची दोन ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. धरणातून नदीपात्रात 30 हजार क्‍युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्यास सुरूवात होताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सतर्क होवून उपाययोजना सुरूवात करते. त्यामध्ये आवश्‍यकता वाटल्यास पुणे येथून एनडीआरएफच्या पथकालादेखील पाचारण करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे यांनी सांगितली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)