नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या दरबारात दावा केल्या जाणाऱ्या चमत्करांपासून ते मुलाखतींमधून केलेल्या वादग्रस्त विधानांपर्यंत ते सतत वादात अडकल्याचे पाहायला मिळाले. संत तुकाराम महाराज आणि साईबाबा यांच्याविषयीही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतरही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता बिहारमधून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
धीरेंद्र शास्त्री बिहारला जाणार आहेत. त्याच्याआधीच बिहार सरकारमधील अनेक मंत्री आणि नेते त्यांचा विरोध करत आहेत. अशातच मंत्री सुरेंद्र यादव यांनी धीरेंद्र शास्त्रींवर जोरदार टीका केली आहे, “धीरेंद्र शास्त्री हे भुताच्या नावाखाली महिलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवतात” असे वक्तव्य सुरेंद्र यादव यांनी केले आहे.
बागेश्वर धाम के बाबा पर बिहार के मंत्री सुरेंद्र यादव का बयान -“शर्म करो, डूब मरो, भूत के नाम पर वो आपकी मां, बहन को नचाता है” | pic.twitter.com/3u4Ws7S6oc
— Priya singh (@priyarajputlive) May 6, 2023
व्हायरल व्हिडिओमध्ये मंत्री सुरेंद्र यादव यांनी, बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र शास्त्री जर बिहारमध्ये येऊन तुमच्या बहिणींना-मुलींना भुताच्या नावाखाली आपल्या इशाऱ्यावर नाचायला लावत असेल तर, तुम्ही पाण्यात बुडून मरा, ते पुढे म्हणाले, जे नेते किंवा पक्ष बागेश्वर धामला पाठिंबा देतात त्यांच्या घरातील महिला तिथे जातात का? तुमच्या घरातील महिला तिथे जातात ही लाजीरवाणी गोष्ट आहे.असे म्हणताना दिसून येत आहेत.
सुरेंद्र यादव यांच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. या व्हायरल व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री 13 मे रोजी बिहारला जाणार आहेत. धीरेंद्र शास्त्रींच्या बिहार दौऱ्यावर आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांनी, “धीरेंद्र शास्त्री हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांनी तसं केलं तर आम्ही त्यांना विरोध करणार.” म्हटले आहे.