उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा केला आरोप
संगमनेर – संगमनेर विभागीय कृषी कार्यालयात नव्याने रुजू झालेले उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या कर्मचाऱ्यांबाबत गैरवागणुकीला कंटाळून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक कर्मचारी संघटनेने मंगळवारी विभागातील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत त्यांचा निषेध केला.
अधिकाऱ्याच्या विरोधात कृषी सहाय्यक कर्मचारी सह वर्ग – 3 व 4 च्या सर्व कर्मचाऱ्यांनी संगमनेर विभागातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता तालुक्यातील कृषी कार्यालयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बोराळे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पत्र लिहून उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या गैर वर्तणुकीसंदर्भात माहिती देण्यात आली होती; परंतु त्यानंतर देखील उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यासंदर्भात वागणुकीतून काही फरक जाणवला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कृषी सहाय्यक कर्मचारी तसेच वर्ग – 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांशी अत्यंत उद्दामपणे वागणे, महिला कर्मचाऱ्यांना खालच्या शब्दात बोलणे, महिला कर्मचाऱ्यांना उशिरा फोन करणे अशा प्रकारांमुळे महिला कर्मचारी कार्यालयात रडल्याचे उदाहरणे आहेत. तसेच पुरुष कर्मचाऱ्यांना तुम्ही फुकटचा पगार घेता का?, तुमची लायकी नाही, शेण खाता का?, नाहीतर तुम्हाला कामावरून कमी करतो, अशा अर्वाच भाषेत कर्मचाऱ्यांशी बोलणे.
तर भर सभेत शेतीशाळेचे रजिस्टर कृषी सहाय्यकांच्या अंगावर भिरकावल्याचा आरोप संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. कृषी सहाय्यक संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास टप्प्या टप्प्याने आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे.(5 सप्टेंबर) लाक्षणिक सामूहिक कामबंद आंदोलन, (9 सप्टेंबर) उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि (11 सप्टेंबर) बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी यशवंत खोलके, विनायक तळपाडे, संतोष साबळे, सचिन गायकवाड, राजेश तुंभारे यासह मोठ्या संख्येने कृषी सहाय्यक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित कर्मचाऱ्यांशी मी चर्चा करणार आहे. समज गैरसमजुतीचा हा सगळा प्रकार आहे. त्यांची काही गैर समजूत झाली असेल तर ती दूर करण्यात येईल. चर्चेतून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील.
सुधाकर बोराळे उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर