कर्जत – गेल्या महिन्यात पक्षाची निशाणी बाजूला ठेवून कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतलेले राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड यांची राजकीय भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. मेळाव्यात रोहित पवारांवर जोरदार टीका करून विधानसभेच्या उमेदवारीचा दावा ठोकत त्यांनी कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण केले. मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करून गुंड यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचेही लक्ष वेधून घेतले. कुस्ती स्पर्धेचा अपवाद वगळता राजेंद्र गुंड तसेच पत्नी मंजुषा गुंड हे रोहित पवार यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत.मतदारसंघात निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले असतानाही गुंड यांच्या गोटात कमालीची शांतता आहे.
निवडणुकीत रोहित पवार यांचे काम करणार की वेगळी भूमिका घेणार यावर गुंड तसेच त्यांचे कार्यकर्तेही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यांच्याकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याने ही वादळापुर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याने रोहित पवार तसेच सुनंदाताई पवार यांचे मतदारसंघात दररोज दौरे सुरु आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबवित सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र गुंड कुटुंबीयांनी त्यांना साथ देतात कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड हे फक्त कुळधरण येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत. नगर येथे उमेदवारांच्या झालेल्या मुलाखतीनंतर मंजुषा गुंड यांनी रोहित पवार हे मतदारसंघात हस्तक्षेप करीत असल्याचे भाष्य केले होते. राजेंद्र गुंड यांनी मेळाव्यातून पवार आपल्याला विचारीत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे गुंड यांची नाराजी लपून राहिली नसून रोहित पवार यांच्यासाठी डोकेदुखी बनली आहे.
कर्जत तालुक्यात गुंड कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे. कुळधरण गटावर त्यांचे अनेक दशके वर्चस्व राहिलेले आहे. राजकारणाबरोबरच, शिक्षण आदी क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. निवडणूक जिंकण्याची शाश्वती असणारा तालुक्यात त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही जिल्हा परिषद गट नाही. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत गुंड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गुंड कुटुंब हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मानणारे आहेत. मतदारसंघात पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्याशी लढत असल्याने ही निवडणूक तेवढी सोपी राहिलेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांनी एकजूट दाखवली तरच लढत चुरशीची होऊ शकते. कार्यकर्त्यांना नेत्यांमध्ये वेगळे मतप्रवाह दिसत आहेत. हेच चित्र कायम राहिल्यास त्याचा प्रा.राम शिंदे यांना फायदा होणार आहे.
उमेदवारी डावलली तर!
गुंड हे पूर्वी भाजपात होते. अनेक वर्षांपासून त्यांचे विखे कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. राष्ट्रवादीने उमेदवारी डावलली आणि विखेंकडून “चांगला’ शब्द मिळाला तर ते कोणताही निर्णय घेवू शकतात. भाजपा- सेनेची युती न झाल्यास त्यांना शिवसेनेचाही पर्याय उपलब्ध असेल.
पक्षाची पदे ठेवली बाजूला
उमेदवारीचे दावेदार होऊन मतदारसंघात रोहित पवार सक्रिय झाल्यानंतर मंजुषा आणि राजेंद्र गुंड यांच्याकडून पक्षाच्या पदाचा वापर बंद झाला आहे. मंजुषा गुंड यांच्या पोस्टरवरुन “जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस’ हे पद गायब झाल्याचे दिसत असून “माजी जिल्हा परिषद अध्यक्षा’ एवढेच दिसत आहे. तर राजेंद्र गुंड हे मित्र मंडळाचा वापर करीत आहेत.