Dharashiv Lok Sabha । मागच्या काही दिवसांपासून धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झाला होता. मात्र आता या जागेवरचा तिढा अखेर सुटल्याचे दिसत आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आजच त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. त्यामुळे अखेर धाराशिवबाबतचा महायुतीचा गोंधळ निस्तरला असल्याचे म्हटले जात आहे.
तानाजी सावंतांचे एक पाऊल मागे Dharashiv Lok Sabha ।
या सर्व परिस्थितीत तानाजी सावंत यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसतंय. कारण, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तानाजी सावंतांकडून त्यांच्यासाठी तिकीट मिळवण्यासाठीचे प्रयत्नही सुरू होते. मात्र, प्राप्त माहितीनुसार, धनंजय सावंतांना लोकसभेसाठी तिकीट मिळणार नसून अर्चना पाटलांना तिकीट दिलं जाणार आहे.
मविआकडून ओमराजे निंबाळकर Dharashiv Lok Sabha ।
महाविकास आघाडीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून, मागील काही दिवसांत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचा दौरा देखील केलाय.
आता निंबाळकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार? याची उत्सुकता होती. मात्र, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
निवडणुका तोंडावर आल्या तरीदेखील अद्याप उमेदवार मिळत नसल्यानं महाविकास आघाडी आणि महायुचीची डोकेदुखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रातील 48 मधील असे काही मतदारसंघ आहेत, जिथे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पक्षाला जरी जागा सुटल्या असल्या तरी त्या-त्या पक्षांना काही मतदार संघात उमेदवार मिळत नाहीत. पक्षाकडून चाचपणी सुरू आहे, पण जंगजंग पछाडल्यानंतरही साजेशा उमेदवाराचा शोध काही संपत नाहीय. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास उशीर लागत आहे.