रुग्णवाहिका न मिळाल्याने प्रसूतीनंतर अभिनेत्रीचा मृत्यू

हिंगोली : हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एका मराठी अभिनेत्रीचा आणि तिच्या नवजात बालकाचा दूर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही हृदयद्रावक घटनेमुळे गोरेगावमध्ये गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय पूजा झुंजार या अभिनेत्रीचा आणि तिच्या नवजात बालकाचा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पूजाच्या नातेवाईकांनी केला आहे.

गोरेगावमध्ये राहणाऱ्या पूजाला शनिवारी रात्री उशीरा प्रसूती कळा येऊ लागताच तिच्या माहेरच्यांनी तिला तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास पूजाची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांमध्ये बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर पूजा यांची प्रकृती खालावली.

पूजा यांना पुढील उपचारांसाठी हिंगोलीमध्ये नेण्याचा सल्ला प्राथमिक उपचार केंद्रातील डॉक्‍टरांनी दिला. मात्र पूजा यांना हिंगोलीतील रुग्णालयात हलवण्यासाठी केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा शोध घेण्यास पूजा यांच्या नातेवाईकांनी सुरुवात केली. मात्र ही रुग्णवाहिका मिळायला उशीर झाला आणि त्यामधून पूजा यांना हिंगोलीला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पूजा आणि त्यांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.