कोल्हापूर (प्रतिनिधी): करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चे घर देऊन “आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीत कडवटपणा असला तर तो संपून बंधूभाव वाढीस लागेल, हा संदेश या निमित्ताने खासदार माने यांनी दिला. प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चं घर देणारे देशातील ते पहिले खासदार असतील.
रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरण व्हावे लागते. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनावरील ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी “कोल्हापुरी पॅटर्न’चा विचार दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्यांची त्यांच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी राहायचे अशी त्यांची संकल्पना आहे.
गृह विलगीकरणाच्या या संकल्पनेला “आपुलकी गृह’चे नाव देत या कोल्हापुरी पॅटर्नला हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील स्वत:चे घर देऊन आज प्रत्यक्षात उतरविले आहे. स्वत:च्या संकल्पनेची स्वत:पासूनच सुरुवात करून धैर्यशील माने यांनी समाजाला आदर्श प्रेरणा दिली आहे.
कराड येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रथमेश लोहार काही दिवसांपूर्वी आपल्या गावी रुकडीमध्ये आला. कोव्हिड केअर सेंटरमध्ये त्याच्या स्वॅबचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज त्याची खासदार माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली आहे.
याबाबत धैर्यशील माने म्हणाले, गावामध्ये येणारे आपलेच नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी गावा-गावाने पुढे यावे आणि आपुलकीच्या ओलाव्याचा आधार द्यावा. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा, असे आवाहन करतानाच गावामध्ये भाऊबंदकीत जर काही कडवटपणा असेल तर तोही निघून जाईल आणि खऱ्या अर्थाने बंधूभाव वाढीस लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी सुविधांवर मर्यादा येत असतात. त्याचबरोबर काही प्रमाणात भेदभाव दिसून येतो. सामाजिक अंतर म्हणजे मानसिक दुरावा नाही यातून मनावर मोठा ताण येत असतो; परंतु माने यांनी स्वत:चे घर उपलब्ध करून दिल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे.
– प्रथमेश लोहार