नवी दिल्ली – करोनाचा धोका कायम असतानाही देशात सराव तसेच क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्यात आल्याने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (नाडा) खेळाडूंच्या चाचणीसाठी नवे कर्मचारी नियुक्त केले आहेत.
करोनामुळे सध्या देशभरात वैद्यकीय कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग खूप व्यस्त असल्याने पुन्हा त्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी नाडाने हा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व क्रीडासंकुले तसेच मैदाने खुली करण्यात आल्याने नाडाचेही काम वाढले आहे. येत्या काळात होत असलेल्या स्पर्धांपूर्वीच खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेतली जाणार आहे. मात्र, करोनामुळे नाडाचे सध्याचे कर्मचारी व्यस्त आहेत. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याने नवे कर्मचारी या चाचण्यांसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण देशात जिथे क्रीडा संकुले तसेच मैदाने खुली झाली आहेत तिथे सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंची चाचणी घेतली जाणार आहे.
क्रिकेटपटू पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता, त्यामुळे त्याच्यावर 8 महिन्यांची बंदी लावली गेली होती. त्यावेळी अन्य क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्याही चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर यंदाही या चाचण्या घेण्यात येणार आहेत.